मुंबई : (Padmasingh Patil saved Chhagan Bhujbal’s life) बंडखोर एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यभर राजकीय वातावरण पेटलं आहे. शिंदे महाविकास आघाडी विरोधात जवळपास चाळीसहुन अधिक आमदारांना घेऊन गुवाहाटी मध्ये तळ ठोकून आहेत. दुसऱ्या बाजूला शिवसेनेत मोजकेच आमदार शिल्लक राहिले असल्याच चित्र उभं आहे. यावर आता काही प्रमाणात शिवसेनेकडून शिंदे गटातील आमदारांना समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न सुरु आहे.
असाच प्रकार शिवसेनेत नव्वदच्या दशकात घडला होता. त्यावेळी छगन भुजबळ हे सेनेची धडाडती तोफ म्हणून ओळखले जायचे. त्याकाळात विधानसभेत सेनेचे भुजबळ एकमेव आमदार होते. सेनेचा एक आमदार काॅंग्रेसला सळो की, पळो करुन सोडत होता. मंडल आयोगाच्या काळातील आंदोलनात बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या ओबीसी विरोधी काही भूमिकांमुळे छगन भुजबळ शिवसेनेवर नाराज झाले.
१९९१ मध्ये ऐन अधिवेशनात छगन भुजबळांनी शिवसेनेच्या १८ आमदारांसह बंड केलं. दुसऱ्या बाजूला बाकीच्या आमदारांनी मात्र ऐनवेळी कच खाल्ली. बाळासाहेबांच्या क्रोधाला घाबरून १८ पैकी १२ आमदार शिवसेनेत परतले. भुजबळांनी मात्र आपलं बंड मागे घेतलं नाही. शिवसेनेत यापूर्वी बंड हा शब्द देखील उच्चारणे गुन्हा होता. छगन भुजबळांना गद्दार म्हणून त्यावेळी घोषित करण्यात आलं.
कित्येक शिवसैनिक त्यांच्या जीवावर उठले होते. असे काहीसे घडेल याची शरद पवारांना पुर्वकल्पना होती. त्यांनी भुजबळांच्या संरक्षणाची अगोदरच व्यवस्था करुन ठेवली होती. उस्मानाबादचे आमदार पद्मसिंह पाटील हे त्यांचे जवळचे सहकारी व नातेवाईक होते. त्यांचा दरारा खूप मोठा होता. पवार यांनी भुजबळ यांना पद्मसिंह पाटील यांच्या घरात काही दिवस लपवून ठेवले होते. आजही भुजबळांनी केलेलं बंड आणि पद्मसिंह पाटलांनी त्यांचा वाचवलेले जीव याची आठवण हमखास सांगितली जाते. पुढे अनेक दिवस भुजबळांना कमांडो प्रोटेक्शन मध्ये राहावं लागलं.