Oppenheimer | सध्या संपूर्ण देशभरात ‘ओपनहायमर’ (Oppenheimer) या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. हा चित्रपट 21 जुलै 2023 रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट अणुबॉम्बचे जनक अमेरिकन भौतिकशास्त्र ज्युलियस रॉबर्ट ओपनहायमर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता सिलियन मर्फिने मुख्य भूमिका साकारली आहे. सगळीकडे हा चित्रपट चर्चेत असतानाच तो आता भारतात वादात सापडला आहे. कारण या चित्रपटात सेक्स सीनदरम्यान भगवद्गीतेचं वाचन करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तर या सीनबाबत आता सिलियननं भाष्य केलं आहे.
सिलियनने ‘जीक्यू’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला ओपनहायमर चित्रपटात बोल्ड सीन आवश्यक होते का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सिलियन म्हणाला की, “या चित्रपटात ते सीन महत्त्वाचे होते असं मला वाटतं. कारण ओपनहायमरचं जीन टॅटलॉकसोबतचं नातं या स्टोरीचा महत्त्वाचा भाग आहे. तसंच कोणालाही तसे सीन करायला आवडत नाही पण ते कामाचा भाग म्हणून करावे लागतात.”
ओपनहायमर चित्रपटाचा दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन त्या सीनबाबत म्हणाला की, तुम्ही जेव्हाही ओपनहायमरच्या जीवनाकडे पाहत असता त्यावेळी तुम्ही त्याच्या कथेकडे पाहत असता. त्यामुळे त्याच्या आयुष्यातील वेगवेगळे पैलू, स्त्रियांसोबतचे त्याचे वागणे अशा सर्व गोष्टी त्याच्या कथेचा आवश्यक भाग आहेत आणि ते प्रेक्षकांना दाखवणं गरजेचं वाटलं.”