इडी कार्यालयासमोर निदर्शने करणे यापेक्षा महागाईवर निदर्शने, मोर्चे काढायला पाहिजेत. ते प्रभावीपणे अमलात आणायला पाहिजेत. घराण्याची हुजरेगिरी करणारी आंदोलने पक्षाला जनमानसात स्थान मिळवून देणार नाहीत. हेरॉल्ड प्रकरणात सत्य समोर येईल ते पचवायला पाहिजे.
काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी आता तरी योग्य नियोजन, ठोस कार्यक्रम आणि पक्ष पुढे नेणारा नेता तोही पूर्णवेळासाठी पाहिजे. घराण्यावर निष्ठा दाखवण्यासाठी केली जाणारी आंदोलने पक्षाला पुढे नेऊ शकणार नाहीत. काँग्रेसला असणारी प्रदीर्घ परंपरा, हिमालयाच्या उंचीचे नेते, पक्षात असणारे विचारवंत आणि काँग्रेसच्या विचारधारेची पक्की तोंडओळख असणारे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये होते. स्वातंत्र्याचा इतिहास म्हणजे काँग्रेसचा इतिहास असा लौकिक असणारा हा पक्ष आज अगदीच हीनदीन अवस्थेत आलेला आहे.
एक मात्र नक्की आपल्या देशातून काँग्रेस संपूर्ण संपू शकत नाही. काँग्रेसमुक्त भारत होऊ शकत नाही. याची काही कारणे आहेत, त्यात एक कारण आहे देशातील अनेक राजकारणप्रिय कार्यकर्त्यांना दाखवण्यासाठी एखादा पक्ष पाहिजे असतो. पाच वर्षांत प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या निवडणुका होत असतात. यासाठी पूर्णवेळ काम करणारी एक यंत्रणा पाहिजे असते. मनुष्यबळ गरजेचे असते. पक्ष अशा कार्यकर्त्यांच्या शोधात असतो आणि असे कार्यकर्ते पक्षाच्या! काँग्रेस हा पक्ष त्यांच्यासाठी उपयुक्त आहे आणि त्यामुळे तो जिवंत ठेवण्याची गरज आणि आवश्यकता यामुळे काँग्रेस कायम टिकणारा, टिकाऊ पक्ष आहे.
दुसरा मुद्दा असा भारतीय जनता पक्षाला काँग्रेसमुक्त करायचा आहे. मात्र ही केवळ घोषणाच द्यायची आहे. याचे कारण लोकशाही आहे. सत्ताकांक्षा सगळ्याच पक्षांना आहे. विरोधक कायम राहणारच आहेत. अशा परिस्थितीत नव्या विरोधी पक्षाच्या खोड्या जाणून घेऊन त्याचा मुकाबला करताना चुका जास्त होण्याची शक्यता जास्त असते. याउलट काँग्रेससारखा आता हाताळायला सोपा पक्ष विरोधक म्हणून ‘ठेवणे’ भारतीय जनता पक्षाला सोयीचे आहे. आपसारख्या पक्षाला सीमित ठेवायचे असेल तर काँग्रेसला जिवंत ठेवणे हा एक व्यूहरचनेचा भाग असू शकतो. तिसरा मुद्दा असा, की काँग्रेस जवळचे प्रादेशिक पक्ष प्रदेशापुरते मर्यादित ठेवायचे. त्यांना राष्ट्रीय होऊ देता कामा नये. कारण राष्ट्रीय पक्षात प्रादेशिक पक्षाचे रुपांतर झाले, की संघर्षही मोठा असतो. भारतीय जनता पक्षाला अशा पक्षाशी लढण्यात वेळ घालवायचा नाही. साहजिकच ज्या प्रांतात जे प्रादेशिक पक्ष सबल असतील त्यांना बरोबर घ्यायचे आणि विरोधातले किंवा लहान पक्ष ताकदीने संपवणे तुलनेने सोपे असते. त्यांना संपवणे म्हणजे काँग्रेसला संपवणे मात्र केवळ काँग्रेसच्या फांद्या तोडणे एवढाच विषय भारतीय जनता पक्षाने ठेवला आहे.
काँग्रेसला पूर्ण संपवणे हा मुद्दा असणार नाही. भारतीय जनता पक्षाला या सगळ्यावरून काँग्रेस कायम ठेवायची आहे. गांधी, नेहरू परिवार कायम ठेवायचे आहे. नेहरू, गांधी परिवार आणि महात्मा गांधी या विचारधारा कायम ठेवून त्याविरोधात आणि सोयीने बाजूने बोलणे सहज शक्य आहे. नव्या राष्ट्रीय पक्षाकडे विचारांचा साठ, आता चुकीचे ठरवणारे ऐतिहासिक निर्णय प्रादेशिक आणि नव्या पक्षांकडे नसतील, उलट भारतीय जनता पक्षाचे निर्णय कसे चूक असतील, हे नवा पक्ष सांगेल. साहजिकच काँग्रेस त्यांच्या विचारधारेसह जिवंत ठेवणे गरजेचे आहे. सोपे आहे. काँग्रेसजनांनी या सगळ्याचा विचार केला तर काँग्रेसजनांना आपल्या अस्तित्वादबद्दल नक्की खात्री असायला पााहिजे आणि असे असेल तर नियोजन आणि पक्षबांधणीसाठी काम केले पाहिजे. ज्येष्ठ नेते काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज आहेत. निर्णय विलंबाने होत आहेत. ते ज्या ताकदीने घ्यायला पाहिजेत तसे घेतले जात नाहीत. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातील विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या जागेवर अजून उमेदवार दिला जात नाही. शरद पवार यांच्या खुशी, नाराजीवर अध्यक्षपदाचा निर्णय अवलंबून ठेवला जात आहे. पक्ष वाढवायला संधी असताना केवळ शीर्षस्थ नेतृत्वामुळे त्यांच्या थंडा करके खाओ या प्रवृत्तीमुळे पक्ष वाढत नाही. असे असताना संघटन मजबूत करायचे की नाना पटोलेंसारख्या धडाडीच्या नेत्याला मागे खेचायचे हा प्रश्न आहे. माणिकराव ठाकरे आणि त्यांच्या कार्यपद्धतीच्या नेतेमंडळींचा विचार शरद पवार यांच्यामुळे आपल्याला सत्तेत स्थान मिळाले आहे. शरद पवार यांच्यावर किमान पटोले यांनी बोलू नये.
मात्र राजकारणात अशा परिस्थितीत संधींचा फायदा घ्यायचा असतो. संधी वारंवार येत नाही. तिचा वापर न करणारा आळशी म्हणावा. हा अजगरी आळशीपणा सध्या काँग्रेसमध्ये पाहायला मिळतो आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि अखेरीस प्रियंका गांधी-वाड्रा यांना काँग्रस वाचवण्यास पाचारण करण्यात आले. मात्र अपयशाने ना त्यांची म्हणजे गांधी घराण्याची पाठ सोडली नाही. ना काँग्रेसची. ईडी कार्यालयासमोर निदर्शने करणे यापेक्षा महागाईवर निदर्शने, मोर्चे काढायला पाहिजेत. ते प्रभावीपणे अमलात आणायला पाहिजे. घराण्याची हुजरेगिरी करणारी आंदोलने पक्षाला जनमानसात स्थान मिळवून देणार नाहीत. हेरॉल्ड प्रकरणात सत्य समोर येईल ते पचवायला पाहिजे. बोलावले नसताना ईडीकडे चौकशीला जाणारी मंडळी सोबत असताना काँग्रेस अजून का चाचपडत आहे? किरकोळ आंदोलनांपेक्षा ताकद वाढवण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत.