आडनावावरून डाटा गोळा करण्यास विरोध

राष्ट्रवादी ओबीसी सेलचा विरोध

पुणे : राज्यात ओबीसीचा इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी समर्पित आयोगाची नेमणूक करण्यात आली आहे. यंत्रणेच्या वतीने चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा करण्यात येत आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ओबीसींचा इंपिरिकल डेटा गोळा करणे म्हणजे शुद्ध बेजबाबदारपणा असल्याचे म्हणत आडनावावरून ओबीसींचा डाटा गोळा करण्यास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलने विरोध केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केल्यानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी मा. बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे. सदर आयोगाने सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इंपिरिकल डेटा दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होते, परंतु असे निदर्शनास आले आहे की, आयोग वरीलप्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहे, ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक होत आहे.

तसेच सॉफ्टवेअरवर सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाचे भविष्यातील कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे समर्पित आयोगाद्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तत्काळ थांबविण्यात यावे. तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व इतर यांचेमार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासनामार्फत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल अध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण राज्यभर आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. माजी नगरसेविका पुणे शहर उपाध्यक्षा रुपाली ठोंबरे पाटील, पुणे शहराध्यक्ष दीपक जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष शिवदास उबाळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून आपला निषेध नोंदवला व ओबीसी सेलच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिल्या.

याप्रसंगी सभापती वसुंधरा उबाळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय देवकाते, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिवरकर, पुणे शहर उपाध्यक्ष विलास साळुंखे, पुणे शहर चिटणीस राखी श्रीराव, मावळ तालुकाध्यक्ष मंगेश खैरे आदी उपस्थित होते.

Prakash Harale: