सोलारीस क्लबच्या वतीने टेनिस स्पर्धेचे आयोजन

पुणे : सोलारीस क्लब तर्फे ‘सोलारीस क्लब अखिल भारतीय अजिंक्यपद मालिका (चॅम्पियन सिरीज) टेनिस (१२ वर्षाखालील) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेत देशातील १५० हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा कोथरूड येथील सोलारीस क्लब, मयुर कॉलनी ८ ते १२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये होणार आहे.

सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे बारावे वर्ष असून स्पर्धेत सुमारे दिडशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा १२ वर्षाखालील मुले व मुलींच्या राष्ट्रीय मानांकन गटात होणार आहे. स्पर्धेत एकेरी व दुहेरी गटाचे सामने होणार आहेत.

स्पर्धेत महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा व छत्तीसगढ या राज्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. क्लबच्यावतीने फेब्रुवारी २०२१ मध्ये पुरूषांच्या वरिष्ठ स्पर्धेचे मयुर कॉलनी येथे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते.

या यशानंतर या मानांकित राष्ट्रीय स्पर्धा स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे, असे भानुशाली यांनी सांगितले. स्पर्धेत देशातील १२ वयोगटातील सर्वोत्तम राष्ट्रीय मानांकन असलेले खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेव्दारे शिष्यवृत्ती पारितोषिके व इतरही आकर्षक बक्षीसे, प्रशस्तीपत्रक व करंडक देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली आयोजित करण्यात येत आहे.

याशिवाय स्पर्धेतील विजेत्यांना १५ गुण, उपविजेत्याला १०, उपांत्य फेरीतील खेळाडूला ७ तर, उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडूला ५ गुण मिळणार आहेत. स्पर्धेचे साईनिंग शुक्रवार, ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळात होणार आहे, असे भानुशाली यांनी सांगितले.

Prakash Harale: