“…अन्यथा मला कर्नाटकात यावं लागेल”, संभाजीराजे छत्रपतींचा इशारा

मुंबई | बेळगावमध्ये ‘कन्नड रक्षण वेदीके’ सारख्या संघटनांकडून महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड झाल्यानंतर महाराष्ट्र – कर्नाटक वाद चांगलाच पेटला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यामध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला आहे.

संभाजीराजेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, ”छत्रपती शिवरायांचं चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत. त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारनं करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावं लागेल”, असा इशारा संभाजीराजेंनी कर्नाटक सरकारला दिला आहे.

दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच यावेळी त्यांनीही कर्नाटक सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. “महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आता वेगळी भूमिका घेण्याची वेळ आली आहे. या विषयी राज्य सरकारनं भूमिका घेणं गरजेचं होतं. मात्र, ती भूमिका घेतली जात नाही. आज हल्ले झाले त्यामुळे सीमाभागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासात वाहनांवरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल. त्यानंतर जे होईल त्याला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार असतील”, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

Sumitra nalawade:

View Comments (0)