ओटीटी मनोरंजनाचे नवे दालन

अभिनेते मकरंद अनासपुरेंचे प्रतिपादन

ओटीटी माध्यम प्रत्येक कलाकृतीला जागतिक पातळीवर घेऊन जाणारे आहे. थिएटर माध्यमासाठी काम करताना आखीव साच्यामध्ये काम करावे लागते. प्रत्येकालाच काहीतरी वेगळं काम करण्याची इच्छा असते. ती संधी ओटीटी प्लॅटफॉर्म मिळवून देते, असे सांगत ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मत व्यक्त केले. परिसंवादात ते बोलत होते.

पुणे : यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ छायाचित्रकार सुरेश देशमाने, ज्येष्ठ पत्रकार सौमित्र पोटे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मकरंद अनासपुरे म्हणाले, ओटीटी हे माध्यम जरी तुम्हाला जागतिक पातळीवर नेणारे असले तरी थिएटरसाठी ओटीटी हे माध्यम कायमच स्पर्धक समजले जाते. पण मराठी चित्रपटांना जर योग्य पद्धतीने थिएटर मिळाले तर हा संघर्ष होणार नाही. उलट ज्या चित्रपटांना कमी थिएटर्स मिळतात त्यांच्यासाठी तर ओटीटी हे माध्यम नक्कीच वरदान आहे. थिएटरसाठी जी आव्हाने आज मराठी सिनेमासमोर उभी आहेत ती आव्हाने आज नक्कीच ओटीटी या माध्यमासाठी नाहीत.

पुढे ते म्हणाले की, आज मराठी सिनेमाच्या थिएटरचा विषय कायमच मोठा प्रश्न राहिलेला आहे. यावेळी मकरंद अनासपुरे यांनी एकूणच अभिनय, दिग्दर्शन आणि सगळ्यात विषयांसोबत मुशाफिरी केली. त्यावेळी त्यांनी नाटक हे कायमच माझं आवडतं माध्यम राहिलं आहे असं सांगितलं आणि नाटकामुळेच एक उत्तम अभिनेता झाल्याचेही नमूद केलं.

शेवटी ते म्हणाले की, नाटक तुम्हाला खूप काही शिकवतं, तुम्हाला घडवतं. नाटकात तुम्ही थेट बोलता आणि प्रेक्षकही तुम्हाला थेट सांगतात हे सगळं नट म्हणून माणूस म्हणून तुम्हाला घडवत असतं. आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये ४२ टेक घेणारेही अभिनेते आहेत आणि कॅमेरा शेजारी संवाद ठेवून संवाद म्हणणारेही आहेत. तुम्ही ठरवा तुम्हाला काय व्हायचे? अशावेळी प्रत्येक गावागावांमध्ये नाट्यगृहे आहेत.

त्या नाट्यगृहांमध्ये जर नाट्य चित्रपटगृहे केलीत तर तिथे सिनेमे दाखवले जाऊ शकतात. त्यातील मिळणार्‍या उत्पन्नापैकी किमान दहा रुपये जरी निर्मात्याला मिळाले आणि उरलेली रक्कम त्या नाट्य चित्रपटगृहाच्या मेंटेनन्ससाठी ठेवली तर नक्कीच सिनेमांना चित्रपटगृहे मिळतील आणि निर्माताही बुडणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Prakash Harale: