कुडाळ | Raj Thackeray – गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावरून सुरू असलेल्या वादावर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही,” असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. सध्या ते कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज (1 डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी लिहिलेला नाही. या गोष्टी पोर्तुगीज, मोघल, ब्रिटिशांकडून आल्या आहेत. महाराजांच्या काळातील एक ग्रंथ म्हणजे शिवभारत. त्यात ज्या गोष्टी सापडल्या त्या आपल्यासमोर आहेत. आपल्याकडे या व्यतिरिक्त काही दाखले, पत्रच नाहीत. त्यामुळे यातून काहीतरी शोधून लोकांपर्यंत इतिहास पोहोचवावा लागतो. त्यामुळे प्रतापराव गुजरांसोबत कोण सहा लोक होते याला काही अर्थच उरलेला नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याशिवाय तुम्ही इतिहास दाखवू शकत नाही. फक्त इतिहासाला धक्का लागणार नाही हे बघणं गरजेचं आहे. अशाप्रकारे शिवरायांना धक्का लावणारं मायेचं पूत अजून जन्माला यायचं आहे”, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.