‘छंद हे उपजीविकेचे साधन असावे की नको’ यावर अनेक मते असू शकतात, पण ते उन्नतीचे साधन नक्की बनवता येऊ शकते, हे विकास शिंपी यांनी सिद्ध केले आहे. २०१०-११ च्या काळात नव्याने रुळत असलेल्या ‘नेचर अॅक्वेरियम’ या जपानी कलेने त्यांना भुरळ घातली. काचेच्या पेटीत रंगीबेरंगी मासे पालनाची आवड असणार्यांसाठी लाईव्ह प्लांट्सचे हे जग खूपच आकर्षक असते. एका काचेच्या छोट्याशा पेटीत लाईव्ह प्लांट सजवण्याच्या या जपानी कलेला अॅक्वास्केपिंग म्हणतात. पाण्याखालील दुनियेत ते अक्षरशः रमले. पाणवनस्पतीशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यात हातखंडा मिळविला. चांगल्या कंपनीत नोकरी करीत असतानाही केवळ आवड म्हणून त्यांनी अॅक्वादुनिया या नावाने अॅक्वेरियम व्यवसायाची २०१२ मध्ये सुरुवात केली. ही कला जपानमधून भारतात आली असल्याने त्यात अधिकाधिक अपडेट राहण्यासाठी त्यांनी जपानी तज्ज्ञांकडून ती शिकून घेतली.
या कलेचा उद्गाता म्हणून ओळखल्या जाणार्या ताकाशी अमानो या जपानी अॅक्वास्केपरची उत्पादने आणि पाण्याखालील वनस्पती त्यांनी पुणेकरांसाठी उपलब्ध करून दिली. सुरुवातीला केवळ जवळच्या मित्रांना व ओळखीतल्यांना असे सेटअप करून देता देता त्यांचा व्यवसाय चांगलाच नावारूपाला आला. दरम्यानच्या काळात कामाचा व्याप वाढल्याने नोकरी सांभाळून व्यवसाय करणे अवघड होऊ लागले. नोकरी किंवा व्यवसाय यापैकी एक निवडावे लागणार, असे चित्र तयार झाले. तोपर्यंत व्यवसायात उत्पन्नाची स्थिरता आली असल्याने आता यापुढे स्वतःसाठी काम करायचे, असे ठरवून विकास यांनी व्यवसायाची निवड केली आणि मग सुरू झाला अॅक्वादुनियाचा प्रवास… केवळ ५० चौरस फुटांच्या जागेतून सुरू केलेल्या व्यवसायाची आज सिंहगड रस्त्यावर ९०० चौरस फुटांच्या जागेत सुंदरशी गॅलरी आहे.
आज अॅक्वादुनिया हे नाव ‘नेचर अॅक्वेरियम’ला पर्याय ठरले आहे. पुण्यानंतर आता नाशिकमध्येही त्यांनी आपला व्यवसाय स्थिर केला आहे. बदलत्या काळाबरोबर देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ई-कॉमर्स वेबसाईटही सुरू केली आहे. अॅमेझॉन व फ्लिपकार्टसोबत हातमिळवणी करीत व्यवसायाची व्याप्ती देशभर वाढवली आहे. स्केप या नावाने स्वतःचा ब्रँड सुरू करीत विकास यांनी संपूर्ण भारतीय बनावटीच्या जवळपास १४ वस्तूंची निर्मिती केली आहे, तर अजून ८ उत्पादने लवकरच मार्केटमध्ये उतरण्याच्या तयारीत आहेत. या क्षेत्रातील अनुभवाचा जास्तीत जास्त वापर करीत अॅक्वेरियम व्यवसायातही भारत ‘आत्मनिर्भर’ बनावा, यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.
त्यास ग्राहक व सहव्यावसायिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. संशोधन, नावीन्याचा ध्यास आणि सातत्य या त्रिसूत्रीवर आपला ठाम विश्वास असल्याचे ते सांगतात. कोणत्याही व्यवसायात यश मिळविण्यासाठी परिश्रमाशिवाय कोणताही शॉर्टकट नाही. अखंड परिश्रम आणि जिद्द हेच आपल्या यशाचे गमक आहे, असे ते मानतात.