Out of the Box विचार जागृत व्हावेत

गोष्ट साधारण ८०-८२ सालची आहे. जेव्हा नुकतेच वॉशिंग मशीन नावाचे नवीन यंत्र भारतीय बाजारात उतरले होते. बर्‍याच वॉशिंग मशीन कंपन्या उदयास येऊ लागल्या होत्या, पण व्हिडीओकॉन या कंपनीने मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करून विक्रीत बाजी मारली होती असे म्हणतात. संपूर्ण देशात, पंजाब प्रांतात सर्वात जास्त मशीनची विक्री झाली, अशी बातमी भारतातील सर्व प्रांतीय अधिकार्‍यांकडे पोहोचली होती, त्याचा गाजावाजा वार्षिक कॉन्फरन्समध्ये होणार आणि ते जाणून घेण्यासाठी सर्व प्रांतीय अधिकारी झाडून हजर आले होते.

सर्वांची भाषणे झाली आणि पंजाब प्रांतामध्ये मोठ्याप्रमाणात वॉशिंग मशीन का विकली गेली हे जाणून घेण्यासाठी, मार्केटिंग मॅनेजरना बोलण्याची संधी मिळाली. मार्केटिंग मॅनेजर म्हणाले, पंजाबमध्ये ढाब्यावर, जेवणासोबत मुबलक ताक दिले जाते. पंजाबी लोक आवडीने भरपूर ताक पितात आणि ताक बनवण्यासाठी तिथे पारंपरिकरीत्या रवीचा वापर केला जात असे, ज्याची मागणीनुसार ताक बनवण्याची क्षमता नव्हती म्हणून त्यांना दुसरा चांगला पर्याय हवा होता.

ताक बनविण्यासाठी दही मोठ्या प्रमाणात घुसळावे लागते आणि वॉशिंग मशीन घुसळण्याचे काम रविपेक्षा जास्त कौशल्याने करू शकते, अशी कल्पना मार्केटिंग मॅनेजरला आली आणि त्याने वॉशिंग मशीनचा वापर ताक बनविण्यासाठी करून, प्रयोग यशस्वी केला. आता घरोघरी विक्री करण्यापेक्षा हॉटेल व ढाबे यांना लक्ष्य करण्यात आले. पंजाब प्रांतामध्ये अभूतपूर्व विक्री होऊ लागली आणि विक्रीचे सर्व उच्चांक पार झाले.

हा किस्सा खरा की खोटा माहीत नाही, पण कॉलेजमध्ये असताना आम्हाला धीरूभाई अंबानी बनण्याचे वेड लागले होते, त्या काळात जरा हटके कथा ऐकायला मिळायच्या, त्यातीलच ही एक हवीतर म्हणा. अनेक उद्योगपतींचे शून्यातून विश्व उभारल्याचे किस्से ऐकायला मिळायचे, त्यात त्यांनी कोणती वेगळी वाट पकडली, ज्यामुळे ते आज या पदावर पोहोचले हे जाणून घेण्याचे कुतूहल असायचे. असाच एक कदाचित कपोलकल्पित म्हणावा असा किस्सा त्यावेळचे प्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांच्याबाबत ऐकायला मिळाला, तो पुढच्या भागात सांगतो.

थोडक्यात काय आमच्यात out of the Box विचार जागृत व्हावेत हा उद्देश ठेवून आमचे सर, सीनियर्स अशा कथा मीठ-मसाला लावून सांगत. शैक्षणिक काळातील रटाळ जीवनात, भावी आयुष्यात काहीतरी मोठे, धाडसी करण्याची ऊर्मी होती आणि त्याची स्वप्ने रंगवताना कदाचित आपल्यालाही अशीच एखादी कृप्ती मिळाल्यास, आपणही काहीतरी वेगळे करू म्हणत असताना, अशा गोष्टी कानावर आल्या की, अगदी मृगजळ प्राप्त झाल्याचा भास होई.

Prakash Harale: