नवी दिल्ली | Sundar Pichai – गुगलचे सीईओ (Google CEO) सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांना सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण’ (Padma Bhushan) प्रदान करणात आला. सुंदर पिचाई यांना भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. व्यापार व उद्योग प्रकारात 2022 या वर्षासाठी पिचाई यांना पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी पिचाई यांनी भारताचे आभार मानले.
सुंदर पिचाई म्हणाले, “भारत हा माझाच एक भाग आहे. मी जिथं जातो, तिथं भारत माझ्यासोबत असतो. मी या पुरस्कारासाठी भारतीय नागरिक आणि सरकारचा अत्यंत आभारी आहे. ज्या देशानं मला घडवलं त्या देशाकडून हा सन्मान मिळणं माझ्यासाठी मोठी बाब आहे. मी शिक्षण आणि ज्ञानाची आवड असलेल्या कुटुंबात लहानाचा मोठा झालो, हे माझं भाग्य आहे. मला माझ्या आवडीनुसार क्षेत्र निवडता यावं यासाठी आई-वडिलांनी मोठा त्याग केला”, अशी भावना पिचाई यांनी व्यक्त केली.
“मी गुगल आणि भारत यांच्यातील महान भागीदारी सुरू ठेवण्यासाठी उत्सुक आहे. तंत्रज्ञानाचा लाभ लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत”, असं पिचाई यांनी सांगितलं. सॅन फ्रान्सिस्कोतील या पुरस्कार सोहळ्यात भारताचे वाणिज्यदूत टी. व्ही. नागेंद्र प्रसाद यांच्यासह पिचाई यांचे कुटुंबीय उपस्थित होते.