दृष्टीकोन | स्वाती पेशवे |
पालनजी मिस्त्री यांची कार्यप्रवणता उेखनीय होती. उद्योगाचे प्रणेते असणार्या पालनजींनी हाती घेतलेल्या मुंबईतल्या अनेक प्रतिष्ठित इमारती शापूरजी पालनजी ग्रुपने बांधल्या आहेत. यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत, ब्रेबॉर्न स्टेडियम, ताजमहाल पॅलेस हॉटेल, षण्मुखानंद सभागृह या महत्त्वाच्या इमारतींचा समावेश आहे.
देशाला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवणारे आघाडीचे उद्योगपती पालनजी मिस्त्री यांच्या निधनामुळे खूप मोठी हानी झाली आहे, यात शंका नाही. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. जन्माला आलेला जीव कधी ना कधी इथली यात्रा संपवून परतत असतो. मात्र पालनजींसारखे काही चेहरे दिसेनासे होतात तेव्हा ती संबंधित कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण देशासाठी दुःखद बाब ठरते. उद्योगविश्वाला आकार देण्यात, नवनवीन संकल्पना राबवण्यात आणि नवतेचं वारं खेळवून अनेकांना रोजगार देण्यात अग्रेसर असणारी अशी नावं हे देशाचं खरं वैभव असतं.
केवळ पैशाने नव्हे तर व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, उद्योगशीलता आदी गुणांच्या साहाय्यानं त्यांनी अवघं अवकाश व्यापून टाकलेलं असतं. म्हणूनच अशा महनीयांचा मृत्यू जिव्हारी लागतो. अब्जाधीश असणारे पालनजी मिस्त्री हे शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष होते. मध्यंतरी टाटा समूहात मोठा वाद घडवून आणणार्या सायरस मिस्त्री यांचे ते वडील होत. रतन टाटा यांच्यानंतर सायरस मिस्त्री यांनी काही काळ टाटा समूहाचं अध्यक्षपद भूषवलं होतं. १.०२ लाख कोटी रुपयांची संपत्ती असणार्या पालनजींची दूरदृष्टी उेखनीय होती. २०१६ मध्ये केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ सन्मानाने गौरवलं होतं. हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. ते जगातले १४३ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.
१९२९ मध्ये एका पारशी कुटुंबात पालनजी मिस्त्री यांचा जन्म झाला. शापूरजी पालोनजी ग्रुपची स्थापना १८६५ मध्ये झाली. त्यामुळे लहान वयापासून त्यांना उद्योगाचं बाळकडू मिळालं. पालनजी मिस्त्री यांचं शालेय शिक्षण मुंबईतल्या कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमध्ये पूर्ण झालं. त्यानंतर लंडनमधल्या इम्पीरियल कॉलेजमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. पालनजी यांनी २००३ मध्ये लग्न केलं आणि आयरिश नागरिकत्व घेतलं. मात्र त्यांनी बहुतांश जीवन मुंबईमध्येच घालवलं. वयाच्या अठराव्या वर्षी ‘शापूरजी पालनजी ग्रुप’ या कौटुंबिक व्यवसायात ते सामील झाले आणि १९७० च्या दशकात दुबई, कतार आणि अबुधाबी इथेे व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत केली.
उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी केवळ भारत आणि मध्य पूर्वमध्येच नव्हे तर दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतही आपला बांधकाम व्यवसाय विस्तारला. पुढे बांधकाम क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पाच अब्ज डॉलर्सचं मूल्यांकन असलेल्या या समूहाचे ते अध्यक्ष झाले. त्यांच्या कंपनीच्या सर्व महत्त्वाच्या कामगिरीमध्ये मुंबईतल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इमारतीच्या बांधकामाचाही आवर्जून उेख केला जातो. त्यांच्या समूहाचा व्यवसाय अभियांत्रिकी, बांधकाम, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, जलऊर्जा, वित्तीय सेवा, कापड, अभियांत्रिकी वस्तू, गृहोपयोगी वस्तू, शिपिंग, प्रकाशनं, जैवतंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि आर्थिक सेवांमध्ये पसरलेला आहे. या गटात सुमारे पन्नास हजार कर्मचारी असून, ते जगातल्या ५० देशांमध्ये व्यवसाय करीत आहेत.
पालनजी मिस्त्री हे टाटा समूहातले सर्वात मोठे वैयक्तिक शेअरहोल्डर होते आणि समूहात त्यांचा १८.४ टक्के हिस्सा होता. ते टाटा समूहात ‘फँटम’ या टोपणनावाने ओळखले जात. त्यांच्या निधनाबद्दल देश-विदेशातल्या अग्रणींनी तीव्र दु:ख व्यक्त केलं. त्यांनी वाणिज्य आणि उद्योगजगतात अतुलनीय योगदान दिलं असल्याचं स्मरण अनेकांनी केलं. पालनजी मिस्त्री यांच्या निधनामुळे एका युगाचा अंत झाला असल्याची खंतही अनेकांनी बोलून दाखवली. त्यांना अलौकिक बुद्धिमत्तेचं वरदान लाभलं होतं. देश त्याचा साक्षीदार होता. काम करताना त्यांची सौम्यता अनेकांना भावत असे. त्यांची कार्यप्रवणता उेखनीय होती. उद्योगाचे प्रणेते असणार्या पालनजींनी हाती घेतलेल्या असंख्य प्रकल्पांमध्ये कमालीचा उत्साह दाखवला. मुंबईतल्या प्रतिष्ठित इमारती शापूरजी पालनजी ग्रुपने बांधल्या आहेत.
मिस्त्री शापूरजी पालनजी कन्स्ट्रक्शन लिमिटेड, फोर्ब्स टेक्सटाइल्स आणि युरेका फोर्ब्स लिमिटेड यासह अनेक कंपन्यांचे ते मालक होते. ते असोसिएटेड सिमेंट कंपनीचे अध्यक्षदेखील राहिले. पत्नी पॅटसी पेरिन दुबाश आणि चार मुलं म्हणजे शापूर मिस्त्री, सायरस मिस्त्री, लैला मिस्त्री आणि आलू मिस्त्री हे त्यांचं कुटुंब उद्योगविश्वात वेगळी ओळख राखून आहे. शापूरजी पालनजी समूहाचं व्यवस्थापन शापूर करतात. सायरस यांनी २०१२ ते २०१६ दरम्यान टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून काम केलं होतं.
एकीकडे उद्योगजगतातली अनेक यशोशिखरं त्यांनी सर केली असतानाच दुसरीकडे त्यांना टाटा समूहासोबत संघर्ष करावा लागला. अनेक मुत्सद्दी खेळ्या आणि उद्योगजगतातल्या संघर्षामुळे शापूरजी पालनजी यांचं कर्तृत्व उजळून निघालं. त्यासाठीच ते या क्षेत्राच्या इतिहासात ओळखले जातील.