पंचायत समिती सदस्यांची संख्या १६४ एवढी होणार

पुणे:  आगामी पंचायत समिती (Panchayat samiti) आणि जिल्हा परिषदेसाठी (ZP) 2017 च्या तुलनेत जिल्हा परिषदेसाठी सातने, तर पंचायत समित्यांच्या सदस्यांच्या संख्येत 14 ने वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास जिल्हा परिषद सदस्यांची संख्या 82, तर 13 तालुके मिळून पंचायत समिती सदस्यांची संख्या 164 एवढी होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन-तीन महिन्यांत घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत (Election) चर्चा रंगू लागली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी अतित्वात आल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे.
करोनाचा काळ, राज्यात झालेली सत्तांतरे, सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. मार्च 2022 पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासकराज आहे. यंदा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळे कार्यकत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
2017 मध्ये पुणे जिल्हा परिषदेमध्ये 75 सदस्य तर 150 पंचायत समित्यांचे सदस्य होते. त्यानंतर मागील सरकारच्या काळात महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (Panchayt Samiti) अधिनियम 1961 मधील कलम 9 (1) मध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 55 व जास्तीत जास्त 85 असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. मात्र, त्यास अंतिम रूप प्राप्त झाले नाही. 2011 च्या जनगणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 33 लाख 48 हजार 495 आहे. करोनामुळे 2021 मध्ये राष्ट्रीय जनगणना झाली नाही.
मागील दहा वर्षांत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या वाढली आहे. महायुतीमध्ये तीन आणि महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष असल्याने इच्छुकांची संख्याही मोठी आहे. या वाढीव लोकसंख्येचा विचार करून पंचायत समित्यांसाठी गण आणि जिल्हा परिषदेसाठी गटांची रचना केल्यास अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थेवर काम करण्याची संधी मिळू शकते.

Rashtra Sanchar Digital: