पुणे ’सहकारा’ची पंढरी; शहांच्या हस्ते सीआरसीएस पोर्टलचे उद्घाटन

पुणे | Pune News – सहकार चळवळीसाठी पारदर्शकता आणायची आहे, जबाबदारी निश्चित करावी लागेल. यशाची अनेक उदाहरणे आपण जगासमोर ठेवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखाली आम्ही ठरवले आहे की, येत्या ५ वर्षांत ३ लाख नवीन पॅक बनवणार आहोत. या योजनांचा महाराष्ट्राने जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सांगितले. शहा यांच्या हस्ते रविवारी केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (सीआरसीएस) कार्यालय या पोर्टलचे अनावरण करण्यात आले. पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी शहा म्हणाले, देश एका बाजूला आहे आणि महाराष्ट्र एका बाजूला आहे. कारण देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा ४२ टक्के आहे. महाराष्ट्राचे हेच योगदान दाखवण्यासाठी मी येथे सर्वांना घेऊन आलो आहे. केंद्र सरकारच्या आणि सहकार खात्याचे नेमके व्हिजन काय, हे त्यांनी सांगितले. त्यात सहकार क्षेत्राच्या अनेक निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्यांचे निराकरण झालं. कोणाच्याही नातेवाईकाला नोकरी मिळणार नाही तर फक्त कौशल्य असलेल्या व्यक्तीलाच नोकरी मिळणार असल्याचं ते म्हणाले. को-ऑपरेटिव्ह बॅंकांना मोठे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आता यापुढे सहकार क्षेत्राशी संबंधित पारदर्शक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी

आम्ही कायदा बदलून सहकार मतदारांना अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्यात इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी. यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत. अशा सूचना मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीतच दिलेल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. आतापर्यंत १० हजार कोटींची घोषणा केली, मात्र जेवढे पैसे हवेत तेवढे देऊ, अशीही घोषणा त्यांनी केली.

अजितदादा, तुम्ही उशीर केलात

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत ते पहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळे सर्वांत आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजितदादा, आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहात. हीच तुमची योग्य जागा आहे. या ठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशीरच केला, असे मोठे विधानदेखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच केले. त्यानंतर कार्यक्रमामध्ये उपस्थितांच्या हशा पिकल्या आणि अजितदादांनी ही हात जोडून नमस्कार केले.

Sumitra nalawade: