परिचारक – आवताडे भानावर या !

पंढरपूरच्या रस्त्यावर पूर्णतः खड्ड्यांचे साम्राज्य आहे आणि लोकप्रतिनिधी ही नावाची व्यवस्था कुठेही अस्तित्वात नाही, हे उघड सत्य आहे. भारतीय जनता पक्षाने खासदारकी पासून ते पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या काही मोजक्या नगरसेवकांपर्यंत जो एक आशावाद दाखवला होता तो पूर्णपणे खोटारडा आणि भ्रमनिराश करणारा ठरला आहे. विधान परिषदेचे सदस्य, विधानसभेचे सदस्य, खासदार या तिघांचाही पंढरपूर शहराच्या विकास कामांमध्ये अजिबात लक्ष नाही. सत्तेचा माज चढल्यासारखे हे तिघेजण आपापल्या उद्योजकीय प्रगतीचे आराखडे बांधत सत्तेची फळे चाखत आहेत. परंतु गोरगरीब पंढरपूरकरांच्या सुविधांसाठी मूलभूत विकास कामांचे यांना काही पडलेले नाही. ‘तू बडा की मी बडा’ अशा अहनामिकेमध्ये सध्या प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांच्या सत्ता संघर्षाचा वाद विकोपाला गेला आहे. आपापले गट – आपापले कार्यकर्ते जमवाजमव करून एकमेकांची जिरवण्यात राजकारणातील कुरघोड्या सुरू असून पंढरपूर शहरातील मूलभूत सुविधा सोडवण्याकडे या दोघांचेही दुर्लक्ष आहे. संपूर्ण पंढरपूर शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. घरटी एक माणूस अस्थमा , एलर्जी आणि खोकल्याने आजारी आहे.. हे पंढरपूर नाही तर खड्डेपूर आहे अशी उपहासात्मक चर्चा होत आहे, पण त्याचीही लाज लज्जा कुठल्याही लोकप्रतिनिधीला वाटत नाही.

चौफाळा ते शिवाजी चौक परिसरामध्ये नो होर्डिंग झोन म्हणून जाहीर केला असताना देखील सध्या समाधान आवताडे यांचे हात जोडलेले मोठमोठाले बॅनर येथे लावले आहेत. केवळ आपल्या पक्षाचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपली छबी राहावी, त्यासाठी अत्यंत विद्रपीकरण करत शहराच्या मुख्य रस्त्यावरील प्रत्येक पोलला आपले स्वतःचे छायाचित्र त्यांनी लावले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाडवा -दिवाळी – दसरा या सीझनमध्ये शेकडो लोकांनी नगरपालिकेकडे येथील जाहिरात फलकासाठी, जागांकरिता अर्ज केले परंतु हा ‘नो होर्डिंग झोन’ असल्याचे कारण सांगून एकही व्यावसायिकाच्या मार्केटिंगला नगरपालिकेने स्कोप दिला नाही . तीच नगरपालिका आमदार समाधान आवताडे यांच्या बॅनरबाजीला कशी काय उभी राहते? हे सर्वसामान्यांना पडलेले कोडे आहे. आमचा माल विकावा म्हणून रीतसर पैसे भरून जर आम्हाला होर्डिंगचे परवानगी मिळत नसेल तर फुकटचंबू असलेल्या या समाधान आवताडे यांच्या केवळ राजकीय फलकांकरिता परवानगी कशी काय मिळू शकते? एकमेकांच्या साखर कारखानदारीमध्ये लक्ष घालून – एकमेकांच्या कार्यकर्त्यांचे जाळे तोडत कोण मोठे आहे? हे दाखवण्याची अहनामिका सध्या परिचारक आणि अवताडे यांच्यामध्ये आहे.

अधूनमधून परिचारक कुठल्यातरी दुकानाच्या पायऱ्यावर बसतात आणि त्यांचे कार्यकर्ते, ‘ मालक आता मिसळू लागले आहेत….’ असे ट्रोल चालवतात. सामान्यांच्या किमान मूलभूत समस्या जरी सुटल्या गेल्या तर या स्टंटची गरज नाही. आवताडे लंडन – इंग्लंड फिरत आहेत आणि त्यातून आल्यावर नळ पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळण्याची पत्रे दाखवत आहेत. अशी पत्रे – अशा वल्गना – अशा प्रकल्पांच्या आकडेवारी बघूनच मागच्या तीन निवडणुका पंढरपूरकरांनी ‘बोगल्या’. परंतु कुठलीही पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास आल्याची बातमी कधी दिसली नाही.

अड्यात बसून लोकांना वेड लावण्याचे धंदे पंढरपुरात चालणार नाही हे अवताडे यांना आत्तापर्यंत कळायला हवे. ते परिचारकांशिवाय निवडून येऊ शकत नाहीत आणि परिचारक स्वतः निवडून येऊ शकत नाहीत हे दोघांनीही लक्षात ठेवावे. पण दोघांची ताकद तिसऱ्या करता वापरून भाजपला हवा तो उमेदवार ते निवडून आणू शकतात. जनतेमध्ये तुम्ही ‘आत्मनिर्भर’ नाहीत, किमान भाजपच्या दरबारात तरी ‘आत्मनिर्भर’ असायला हवे आणि यासाठी तुम्हाला जनतेची कामेच केली पाहिजेत. सोंग करून ते जमणार नाही. कारण, भाजपमध्ये अंतर्गत संघीय व्यवस्थेपासून ते गृहमंत्रालयापर्यंतची व्यवस्था तुमच्यावरती नजर ठेवून असते, हे अद्याप दोघांनाही समजले असेल. म्हणूनच प्रवीण दरेकर सारखे लोक येऊन काही चाचपणी करत असतात.

सुदैवाने शहरात कोणीही प्रबळ विरोधक नाही म्हणून यांचे फावते आहे. परंतु जनता या दोघांच्याही बडेजाव पणाला आणि प्रदर्शनाला कंटाळली असून या दोघांनाही शहराची काळजी नाही हे स्पष्ट दिसत आहे. भाजपाचे खासदार असलेले महाराज तर तोंड दाखवत नाहीत. रेल्वेच्या प्रश्नापासून ते राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांपर्यंतची कामे प्रलंबित आहेत. तेथे या खासदार महोदयांचे अस्तित्व देखील जाणवत नाही. भाजपाच्या हिंदू प्रतिमेला आणि भगवाधारी प्रचाराला अक्षरशः काळीमा फासण्याचे काम या महाराज असलेल्या खासदाराने केले आहे. मोदी – शहांच्या शब्दापासून ते फडणवीसांच्या सभांपर्यंतचे सर्व आश्वासने खोटी ठरविण्याचे पाप कर्म त्यांनी केले आहे. इतका निद्रिस्त आणि निष्क्रिय खासदार या पंढरपुराने कधी पाहिला नाही. पंढरपूरकरांच्या समस्यांना अंत दिसत नाही. अतिक्रमणे प्रचंड आहेत, त्यातील अनेक अतिक्रमणे हे परिचारक यांच्याच बगलबच्चे असलेल्या गुंडा पुंडांनी पसरवलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बोलण्याच कुणाची धाडस होत नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसहित काही जण खड्डे बुजवण्याच्या मोहिमा चालवतात. परंतु तो केवळ एक स्टंट आहे. या सर्व लोकांना विचारांचे राजकारण करायला जमेल की नाही? याबाबत साशंकता आहे. प्रसिद्धी माध्यमांवर अवलंबून असणारे हे बुडबुडे पंढरपूरच्या विकासासाठी शाश्वत पर्याय देऊ शकतात का? याची चाचणी खरंतर शहरवासीय करीत आहेत. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात येत आहेत. कधीही तोंड न पाहिलेला खासदार केवळ भाजपाच्या आणि फडणवीस यांच्या शब्दाखातर त्या पंढरपूरकरांनी निवडून दिला आहे. परिचारक कधीच निवडून येत नाहीत, समाधान आवतडे बद्दल आम्हाला ममत्व नव्हतं. परंतु त्या दोघांची एकत्रित शक्ती आणि भाजपाच्या माध्यमातून होणारा विकास या भाबड्या अशावादापोटी यांना भरभरून मतदान झाले. देवेंद्र फडणवीस यांची देखील ही नैतिक जबाबदारी आहे की, त्यांनी या दोन्ही आमदारांना जागेवर आणावं अन्यथा भाजपाकडे देखील उमेदवारांची कमी नाही याचीही जाणीव त्यांना करून द्यावी.

Dnyaneshwar: