उन्हाळ्यामध्ये गारवा मिळण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मूर्तीला चंदनाचा लेप

पंढरपूर | उष्णतेचा हा त्रास होऊ नये म्हणून सर्वांगाला चंदन लावण्याची परंपरा पंढरपुरात अनेक शतकांपासून आजही सुरु आहे. यावेळी अलंकारापेक्षाही सुंदर उठून दिसणारे विठ्ठलाचे रूप डोळ्यात साठ्वण्यासारखे आहे .श्री विठ्ठल रुक्मीणीला थंडावा मिळावा यासाठी खास चंदन उटी पूजा केली जाते.

चंदनाला आयुर्वेदात ही महत्व आहे. चंदन हे अतिशय सुगंधी, शीतल असते. चंदनाच्या याच गुणामुळे दिवसभरातील हवेतील उष्णतेने शिणलेल्या विठू माउलीला शीतलता वाटावी यासाठी रोज दुपारी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो. गुढी पाडवा ते मृग नक्षत्रापर्यंत रोज दुपारी चंदन उटी पूजा केली जाते. पूजेनंतर देवाला नैवेद्य म्हणून कैरीच पन्हा आणि थंड लिंबू सरबत ही दाखवले जाते, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे.

चंदन उटी कशी बनवतात?

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चंदन उटी पूजेसाठी उच्च प्रतीचा चंदनाचा वापर केला जातो. हा चंदन कर्नाटकामधील बंगलुरू, म्हैसूरमधून खरेदी केला जातो . श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी साठी रोज दीड किलो चंदन लागते. पूर्वी या उटीची चंदन पावडर हातानेच तयार केली जायची. परंतु, पाच वर्षांपासून खास यंत्राद्वारे चंदनाची पूड तयार केली जात आहे. या चंदन उटी पूजेसाठी दररोज 750 ग्रॅम चंदनाची आवश्यकता असते. त्यापैकी श्री विठ्ठलाच्या मूर्तीला 500 ग्रॅम चंदनाचा तर श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तीला अडीचशे ग्रॅम चंदनाचा लेप लावला जातो.

Dnyaneshwar: