मुंबई: आजपर्यंत आसामच्या गुवाहाटीचं एवढं वर्णन कोणी केलं नसलं तेवढ शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलं. आणि ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या एका वाक्यामुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले. मात्र, गुरुवार दि. ३० रोजी सायंकाळी बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाजी शपथ घेतली. त्यानंतर माध्यमांनी पाटलांना यांबद्दल विचारलं असता ते म्हणाले, मला इतकंच कळतं की, आमची ही स्वार्थाची लढाई नाही.
दरम्यान ते म्हणाले, आम्हाला बंडखोर वगैरे बोललं जात आहे, हे काही बरोबर नाही. संजय राऊत यांच्यासारखे लोक आमच्या वैचारिक लढाईला बदनाम करत आहेत. पांडुरंगा शप्पथ सांगतो, ही वैचारिक लढाई आहे. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी लढणारी माणसं आहोत. आमची लढाई ही शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी आहे. आम्ही शिवसेना संपवण्याचं पाप कधी करणार नाही, असं यावेळी पाटील म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे हे आमचं नेतृत्त्व करत आहेत, ते कणखर नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करतील, यांनी शिंदे यांच्या नेतृत्त्वाचे पाटील यांनी गोडवे गायले. त्यांनी आपल्या खास शैलीत महाराष्ट्रातील धक्कादायक घटनांनी भरलेल्या राजकारणावरही भाष्य केले. माझ्या भाषेत सांगायचं तर मी म्हणेन की, काय ते मुंबईचा सागर बंगला, काय ते सागर बंगल्यातला देवांचा देव देवेंद्र, काय त्याने दिला आम्हाला महाराष्ट्राचा एक कणखर मुख्यमंत्री, असं त्यांनी शपथविधी सोहळ्या पुर्वीच्या काही घटनांचे वर्णन केलं आहे.