जनता वसाहतीतील धुडगूस वर्चस्वासाठीच

पुणे : स्वतःचे वर्चस्व व दबदबा निर्माण करण्यासाठी काही टोळ्यांकडून परिसरात दहशत माजविण्याचे काम सुरू आहेत. असाच एक प्रकार बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दत्तवाडी भागात घडला. येथे ५० हून अधिक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या भागात वारंवार अशा घटना घडत असल्याने येथील सुमारे साडेपाच लाखांहून अधिक नागरिक टोळी दहशतीच्या छत्रछायेत राहत असल्याचे दिसून आले आहे. येथील टोळी कारवाईबाबत पोलिसांचा वेग मंदावला असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे.

पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचे सत्र सुरू असून, दिवसेंदिवस टोळक्यांचा धुडगूस वाढतच चालला आहे. दरम्यान, शहरातील पर्वती पायथा येथील जनता वसाहत येथे ५० हून अधिक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. साधारणत: ३० ते ३५ जणांनी या परिसरात तोडफोड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

बुधवारी (दि. ८) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेत चारचाकी, टेम्पो, रिक्षा आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी सहकारनगर परिसरातही असाच प्रकार घडला होता. आता पुन्हा एकदा तोच प्रकार घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

सध्या घटनेतील आरोपी कोण आहेत? त्यांनी हा प्रकार का केला आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेत ५० हून अधिक वाहनांची तोडफोड झाली आहे. यामध्ये वाहनमालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कुठली टोळी आहे, हे लवकरच समोर येईल.
_अभय महाजन, पोलीस निरीक्षक, दत्तवाडी पोलीस ठाणे

हा हल्ला नेमका कुणी केला, अजूनही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून अधिकची चौकशी सुरू आहे. दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. याआधीही पुण्यात वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली होती. या घटनेची दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अजूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यापूर्वीही दत्तवाडी भागात अशा अनेक घटना घडल्या आहेत.

अशा गुंड प्रवृत्तींना चाप कधी बसणार…?
दत्तवाडी भागातील जनता वसाहत येथे वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने वाहनमालकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ३०-३५ जणांच्या टोळक्याने हा धुडगूस घालून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. विशेषत: महिलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. मात्र नेहमीच्या अशा प्रकारांना परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. यापूर्वीही दत्तवाडीत असे अनेक प्रकार घडलेत. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांवर चाप कधी लागणार, हा प्रश्न स्थानिक उपस्थित करीत आहेत.

त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, या दत्तवाडी परिसरातील लोकसंख्या सुमारे ५ लाख ५० हजारांहून अधिक आहे, तर अशा घटनांमुळे नागरिक नेहमी तणावात असल्याचे येथील काही नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकाराकडे पोलिसांनी जास्त लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

पुण्यात गेल्या वर्षी काही टोळक्याकडून येरवडा भागात दहशत माजविण्यात आली होती. त्यावेळी टोळक्यांनी वाहनाची तोडफोड केल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. येरवडा फुलेनगर येथील महात्मा फुले उद्यानाजवळ टोळक्याने दगडफेक करीत दोन तरुणांना जखमीसुद्धा केले. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेत ७ ते ८ वाहनांचे नुकसान झाले होते. तसेच हल्लेखोरांनी लोखंडी रॉड व दगडांच्या साह्याने वाहनांवर दगडफेक करीत दहशत माजवली. अनेक दोन तरुण या घटनेत जखमी झाले होते. या घटनेतील आरोपींचा तब्बल वर्षभरानंतरसुद्धा पोलिसांना शोध लागलेला नाही. यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली असता तपास सुरूच असल्याचे सांगण्यात येते.

फुलेनगर सोसायटी परिसरातील हनुमान मंदिर, महात्मा फुले उद्यान, तसेच आळंदी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची यावेळी टोळक्याने मोडतोडसुद्धा केली. याच परिसरात दारू, गांजा पिण्यासाठी बाहेरून मुले येत असतात. निर्मनुष्य ठिकाणी ही मुले दारू, गांजा पिऊन गोंधळ घालत असतात. घटनेपूर्वी या परिसरात काही मुलांचा वाद झाला होता. त्यातूनच रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या टोळक्याने वाहनांची मोडतोड करीत दोन तरुण गंभीर जखमी केले. या घटनेमुळे फुलेनगर व परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

मागील सहा महिन्यांपूर्वी आपल्या टोळीचे वर्चस्व दाखविण्यासाठी व परिसरात दहशत पसरविण्यासाठी गुंडांच्या टोळक्यांनी रस्त्यावर पार्क केलेल्या नागरिकांच्या वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळस आणि कोंढव्यातील शिवनेरीनगर अशा दोन ठिकाणी एकाच दिवशी टोळक्यांनी वाहनांवर दगडफेक करून कोयत्याने काचा फोडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फिर्यादी सोमनाथ भगत यांनी घरासमोर आपली रिक्षा पार्क केली होती.

रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी खैरे व त्याचे साथीदार हातात कोयते घेऊन येथे आले. त्यांनी मोठमोठ्या शिवीगाळ करीत कोण मध्ये येतो त्याला बघतोच माझ्यासमोर या खल्लास करतो, जिवंत सोडणार नाय, असे बोलून फिर्यादी यांच्या रिक्षाची काच फोडून नुकसान केले. तसेच परिसरातील लोकांच्या १० ते १२ दुचाकीवर लाकडी दांडके, कोयते मारून नुकसान केले.

Dnyaneshwar: