आता पंजाबला गँगवॉरची कीड!

नेपाळशीही या हत्येचं कनेक्शन जोडलं जात असून दिल्ली पोलिस नेपाळमध्येही पोहोचले आहेत. या सगळ्यातून लवकरच सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे. मात्र तोपर्यंत अनेक गँगस्टर्सची आणि त्यांच्या टोळ्यांची जोरदार चर्चा सुरू असल्याने पंजाब नव्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.

काही वर्षांपूर्वी पंजाबमधल्या स्थितीवर आधारित ‘उडता पंजाब’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यावरून बराच वादंगही झाला होता. या चित्रपटामुळे पंजाबची बदनामी होत असल्याची टीकाही होत होती. आता सत्तांतर झालं असलं तरी पंजाबमधली गुन्हेगारी कमी झालेली नाही. उलट, प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर पंजाब ढवळून निघाला आहे. नेमकं काय घडत आहे या वलयांकित राज्यामध्ये?

पंजाब म्हटलं की सर्वत्र वाहणारे कालवे, हिरवीगार रानं, कष्टकरी समाज, देशभर पसरलेला शीख समाज आणि समृद्ध खाद्यसंस्कृती नजरेसमोर येते. देशाच्या सीमेवरचं हे राज्य अतिशय संवेदनशील म्हणून ओळखलं जातं. नव्वदच्या दशकात या राज्यात खलिस्तानवाद्यांनी डोकं वर काढलं होतं. अजूनही खलिस्तानवादी अधूनमधून असा प्रयत्न करीतच असतात.

गव्हाचं कोठार असणार्‍या पंजाबला आता गुन्हेगारीचा विळखा बसला आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिथला रोजगार कमी झाला आहे. तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत. एकीकडे सीमेपलीकडच्या अतिरेक्यांचं आव्हान असताना दुसरीकडे राज्याला ड्रग्जची कीड लागली होती.

गेल्या काही वर्षांमध्ये पंजाबला ‘गँगवॉर’नामक नवा आजार जडला असून खलिस्तानी चळवळींमधून खतपाणी घातलं जात आहे. या गँगवॉरनं अनेक बळी घेतले. त्यात नव्यानं एक नाव जोडलं गेलं पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचं. मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

धक्कादायक बाब म्हणजे या हत्येसाठी रशियन बनावटीची अत्याधुनिक रायफल वापरण्यात आली. गँगस्टर्सच्या हाती अशा प्रकारच्या रायफल्स लागणं ही आणखी एका नव्या संकटाची सुरुवात आहे. त्यामुळे आता कुठे आणि कधी गोळीबार किंवा बॉम्बस्फोट होईल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. हे गँगवॉर तरुणाईला उद्ध्वस्त करायच्या मार्गावर आहे. याच गँगवॉरमधून मुसेवालांची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात दिसून येत असलं तरी त्याला काही राजकीय पार्श्वभूमी असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्याचं कारण म्हणजे आमदार झालो तर आपल्याला सुरक्षाव्यवस्था मिळेल, असं मुसेवाला यांनीच म्हटलं होतं.

पंजाबमध्ये सत्तांतर झालं आणि आम आदमी पक्षाची सत्ता आली. त्यानंतर तरी पंजाबमधलं वातावरण बदलेल असं वाटलं होतं; परंतु तसं झालं नाही. ‘आप’ची सत्ता आल्यानंतर त्यांनी जनहिताच्या अनेक घोषणा केल्या. ‘आप’ने भाजप आणि काँग्रेसची वाट लावली. त्यामुळे आता भाजपने जणू ‘आप’ची कोंडी करायचं ठरवलं आहे. पण शह-काटशहाच्या राजकारणात पंजाबमधले मूलभूत प्रश्न मागे पडले आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुसेवालांबाबतच्या घोषणांमधून राजकारण स्पष्ट दिसतं. पंजाबमधली पोटनिवडणूक आणि पुढील लोकसभेच्या निवडणुकीची व्यूहरचना या दृष्टीने मुसेवाला यांच्या हत्याकांडाचा उपयोग केला जात आहे. आरोपींची नावं आणि छायाचित्रं मिळाली असतानाही या हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचं सूतोवाच का केलं जात आहे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

मुसेवाला हे प्रसिद्ध पंजाबी गायक होते. तरुण आणि सळसळतं रक्त… त्यांचे लाखो चाहते… अशा व्यक्तीची पंजाबमधल्या बिश्नोई गँगसोबत दुश्मनी कशी, असा प्रश्न वाचकांना पडला असेल. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अकाली दलाचे युवानेते विक्रमजितसिंह मिड्डुखेडा यांची हत्या झाली होती. या हत्येशी मुसेवाला यांचा संबंध असल्याचा दावा बिश्नोई गँगने केला. मुसेवाला यांच्या हत्येनंतर बिश्नोई गँगने ‘सोशल मीडिया’वर तशा पोस्ट टाकल्या होत्या. मुसेवाला यांना बिश्नोई गँगकडून धमक्याही मिळत होत्या. आता त्यांच्या हत्येनंतर किमान सहा टोळ्या समोर आल्या आहेत.

अमेरिकेतल्या ‘गन कल्चर’प्रमाणे पंजाबमध्येही ‘गन कल्चर’ वाढत असून नवोदित गायकांकडून त्याला खतपाणी घातलं जात असल्याची टीका सातत्याने होत आहे. मुसेवालादेखील त्याला अपवाद नव्हते. त्यांनी बंदुका आणि रायफल्ससोबतची अनेक छायाचित्रं ‘सोशल मीडिया’ वर पोस्ट केली होती. प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी यांनी याकडे लक्ष वेधलं होतं.

बिश्नोईने बॉलिवूड अभिनेता सलमान खानलादेखील धमकी दिली होती. सध्या ही बाबही चर्चेत आहे. ‘रेडी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने सलमानवर हल्ल्याचा कट रचला होता. त्यानंतर २०२० मध्ये त्याचा साथीदार नरेश शेट्टी यानेही सलमान खानच्या घराची रेकी केली होती. पण त्यांचा हेतू साध्य झाला नाही. बिश्नोई गँगचं मुख्य काम खंडणीखोरीचं आहे. हे लोक अनेक व्यावसायिकांकडून खंडणी उकळतात, दहशत पसरवतात.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी सीबीआय किंवा एनआयए तपास होऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्य सरकारचा विषय असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. पंजाब सरकारने शिफारस केल्यास केंद्र सरकार सीबीआय चौकशीसाठी तयार आहे.

मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह आणि आई चरण कौर (सरपंच) यांनी शाह यांची भेट घेतली होती. भाजपनेते मनजिंदर सिरसा यांनीही मुसा गावात कुटुंबाची भेट घेतली. ते म्हणाले की, एनआयए किंवा सीबीआय तपासासाठी पंजाब सरकारची सहमती आवश्यक आहे. याबाबत शाह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी चर्चा करणार आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याआधीच, कुटुंब म्हणेल ते करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. अशा स्थितीत पंजाब पोलिसांनी प्रकरणाचा छडा लवकर लावला नाही तर राज्य सरकारला शिफारस करता येईल. कॅनडामध्ये बसलेल्या लॉरेन्स गँगचा गँगस्टर गोल्डी ब्रार याने मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी घेतली असली तरी पोलिसांनी अद्याप संपूर्ण कटाचा उलगडा केलेला नाही. सिद्धू मुसेवाला यांच्या कथित मारेकर्‍यांचं पहिलं चित्र समोर आलं असून या फोटोमध्ये दोन लोक दिसतात. ही छायाचित्रं मुसेवाला यांच्या हत्येपूर्वीची आहेत.

या फोटोंशिवाय मुसेवालावर हल्ला करणार्‍या हल्लेखोरांचा हल्ल्यानंतरचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. हल्लेखोरांनी बाप्पी आना गावाजवळ एका कारचालकाला थांबवून कार हिसकावून पळ काढल्याचं त्यात दिसत आहे. या हल्ल्याशी संबंधित काही गाड्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत.

_प्रा. नंदकुमार गोरे

Dnyaneshwar: