पंकजा मुंडेचे समर्थक अजुनही संतप्त; भागवत कराडांचाही ताफा अडवण्याचा प्रयत्न

औरंगाबाद | भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी नाकारल्यानं त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज सकाळी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता पुन्हा केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान पोलिसांनी वेळीच परिस्थिती आटोक्यात आणली आहे.

काही वेळापूर्वीच औरंगाबादमध्ये ही घटना घडली असून दोन कार्यकर्ते जे स्वतःला पंकजा मुंडेचे समर्थक असल्याचं सांगत होते. यापूर्वी देखील त्यांनी भाजप कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. याच कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या क्रांती चौकातील कार्यालयाकडे येत अचानक घोषणाबाजी करायला सुरुवात केली.

पंकजा मुंडेंना हेतुपुरस्पर डावललं जात असल्याचा निषेध करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी हा प्रयत्न केला आहे. मात्र आधीच तिथं तयारीत असलेले काही भाजपचे कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांच्या समोर आले आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेची पोलिसांनी आधीच माहिती मिळाली होती. त्यामुळं या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील होता. पण या कार्यकर्त्यांनी गाडीतून उतरुन थेट घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. तसंच पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे.

Sumitra nalawade: