मुंबई | मागील काही दिवसांपासून माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या पंकजा मुंडे या भाजप पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पक्षाकडून पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अलीकडेच पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असलेल्या कार्यक्रमात अनुपस्थिती दर्शवली. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पंकजा मुंडे यांना आपल्या पक्षात घेण्याबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामळे पंकज मुंडे शिवसेनेत पक्षप्रवेश करत असल्याच्या चर्चांना उधान आले. पंकजा मुंडे आमच्या पक्षात आल्या तर त्यांचं आम्ही स्वागत करू, अशा आशयाचं विधान खैरे यांनी केलं आहे. त्यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांनी ठाकरे गटात येण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. ठाकरे गटाच्या ऑफरनंतर पंकजा मुंडे भाजपातून बाहेर पडणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर भाष्य करताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, “गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराकडे दुर्लक्ष करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून सुरू आहे. मी इथे स्पष्ट सांगतो की, सध्याच्या घडीला पंकजा मुंडे यांना दूर करण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे किंवा इतर कोणत्या नेत्यांने पंकजा मुंडेंना दूर केलं असेल.” असे ते म्हणाले.