खड्ड्यात सोडल्या कागदी नावा; बदक, खेकडे, मासेही!

राष्ट्रवादीचे आगळेवेगळे आंदोलन

पुणे : पुणे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची जी चाळण झालेली आहे, त्याला पूर्णत: भाजप जबाबदार असून, या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट येथे अभिनव पद्धतीने आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. पी.एम.टी. डेपोबाहेर केलेल्या या आंदोलनात तेथील रस्त्यावर असणार्‍या मोठ्या खड्ड्यांमध्ये कागदी होड्या, रबरी बदक सोडण्यात आले. तसेच या खड्ड्यांजवळ अर्धगोलात बसून प्रतीकात्मक मासे, खेकडेदेखील पकडण्यात आले.

मागील आठवड्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन पुणे शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवून नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते द्यावे, अशी मागणी केली होती व जर आठवडाभरात पुणे खड्डेमुक्त झालं नाही तर पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यावेळी दिलेला होता. पुणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून, या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. मागील काही दिवसांत या खड्ड्यांमुळे पुणेकरांचे बळीदेखील गेले आहेत. आज पुण्याच्या रस्त्यावर पडलेले खड्डे हे गेल्या पाच वर्षांत रस्त्यांच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची साक्ष देत आहेत. गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले रस्ते जर दरवर्षी पावसाळ्यात दुरुस्त करावे लागत असतील, तर ५ वर्षांत भाजपने केलेल्या रस्त्यांच्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करण्यात आली. ‘खड्डे हा केवळ त्या रस्त्यापुरता मर्यादित विषय नसून या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना पाठीचे, मणक्याचे आजार होत आहेत. काही अपघातांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे, तर काहींचा या खड्ड्यांमुळे दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे.

जर सर्वसामान्य पुणेकरांनी भरलेल्या टॅक्समधून कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते तयार केले जातात, त्याचे निकृष्ट काम केले जाते तर या अपघातात मृत्युमुखी पडणार्‍या नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार धरत गेल्या पाच वर्षातील सत्ताधारी भाजपमधील पदाधिकारी, या रस्त्यांचा दर्जा तपासणारे अधिकारी, या रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीदेखील शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी केली. याप्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संतोष नांगरे, विपुल म्हैसूरकर, मृणालिनी वाणी, शशिकला कुंभार, श्वेता होनराव, संजय दामोदरे, विजय बगाडे, सोनाली उजागरे, राहुल गुंड, प्रदीप शिवशरण, योगेश पवार, मंथन जागडे, अर्जुन गांजे, आनंद बाफना, बाळासाहेब अटल, रूपेश आखाडे, मोहसीन काझी, गणेश दामोदरे, अर्जुन गांजे, आनंद बाफना, सचिन गांधी, नामदेव पवार, अर्जुन भिसे, संतोष पिसाळ, समीर पवार व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nilam: