मुंबई | हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पण त्या दोघांनीही अजून त्यावर काहीही भाष्य केले नाही. पण आता त्यांच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच त्यांचा साखरपुडा होणार आहे. अशातच आता परिणितीच्या घराचा व्हिडीओ समोर आला आहे.
परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख समोर आली आहे. येत्या 13 मे रोजी हे दोघेही साखरपुडा करणार असल्याचे बोललं जात आहे. परिणितीच्या मुंबईतील घराचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तिच्या घराबाहेर रोषणाई केल्याचे पाहायला मिळत आहे. परिणिती राहत असलेल्या संपूर्ण घराला बाहेरुन रोषणाई केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत याची झलक पाहायला मिळत आहे. यावरुन अनेकांनी तिच्या साखरपुड्याची तयारी सुरु झाल्याचे म्हटले आहे.
परिणिती आणि राघव यांच्या साखरपुड्यासाठी 150 लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित असणार आहे. त्यांच्या साखरपुडा समारंभात सकाळी सुखमणी साहिबचे पठण केले जाईल. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या हातात अंगठी घालत साखरपुडा करतील. यानंतर छान डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.