यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती, विरोधी महाविकास आघाडीनंतर आता तिसरी नवी आघाडी मैदानात उतरली आहे. परिवर्तन महाशक्ती असं या आघाडीला नाव देण्यात आले आहे. पुण्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू आणि स्वाभीमानी पक्षाचे राजू शेट्टी उपस्थित होते.
आजच्या बैठकीत 150 जागांचा निर्णय –
पुण्यात झालेल्या बैठकीनंतर परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी माहिती दिली की, बैठकीत १५० जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे. बरेच लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणीस यांच्या विरोधात देखील उमेदवार दिले जाणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांग यांच्याशी देखील आमचं बोलणं सुरु आहे. ते आमच्या सोबत येतील असे प्रयत्न सुरु आहेत. तसेच महादेव जानकर देखील आमच्यासोबत येतील असा विश्वास आहे.
यावेळी बच्चू कडू म्हणाले, सामान्य माणसाला आपलं वाटेल असं सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करु. आम्ही चांगले उमेदवार देणार. पवारसाहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसं काय परिवर्तन तुम्ही करणार? असा सवालही कडू यांनी केला. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार युतीलाही नाही आणि आघाडीलाही नाही तो आम्हाला आहे. नवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थानं कामाचं असेल, बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा आहे.
राजू शेट्टी म्हणाले, आम्ही या निवडणुकीत स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देणार आहोत. आमच्याकडे छोट्या मोठ्या ३० ते ४० संघटना आहेत. छत्रपती संभाजीराजे म्हणाले, प्रस्थिपीत लोकांच्या विरोधात लढा देणारे उमेदवार आम्ही देणार आहोत. मनोज जरांगे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. पण त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही. त्यांनी आमच्यासोबत यावं, अशी आमची भूमिका आहे.