Ramdev Baba : योगगुरू रामदेव बाबा यांची पतंजली कंपनी देशासह विदेशातही व्यवसाय करते. पतंजली कंपनीवरून त्यांच्यावर अनेक आरोपही केले जातात. आता रामदेव बाबा यांनी त्यांच्या पतंजली कंपनीबाबत आणि व्यवसायाबाबत मोठे विधान केले आहे. जर देशाऐवजी व्यवसायाचा विचार केला असता तर आज मी इलॉन मस्क पेक्षा जास्त श्रीमंत असतो असं रामदेवबाबा म्हणाले आहेत.
रामदेव बाबा यांनी एका जुन्या विधानाचा संदर्भ देताना म्हटलं की, मी एकदा बोललो होतो की टाटा, बिर्ला, अदानी, झुकरबर्ग, मस्क, वॉरेन बफे आणि बिल गेट्स यांच्यापेक्षा स्वामी रामदेवची वेळ महत्त्वाची आहे. हे सगळे स्वत:साठी जगतात, मात्र संन्यासी सर्वांसाठी जगतो. त्यामुळे माझा वेळ, शक्ती आणि ज्ञान हे सर्वांच्या कल्याणासाठी आहे. वेद, पुराण, रामायण, महाभारत, भगवतगिता आणि पूर्वजांकडून मिळालेलं ज्ञान मी संशोधन करून सर्वांसमोर ठेवलंय.
मस्क हे तंत्रज्ञानाबाबत बोलतात. पण आपल्याकडे वेद, पुराण, धार्मिक ग्रंथ आणि पूर्वजांचे ज्ञान आहे. जगाच्या कल्याणासाठी ते ज्ञान दिले. मी जर या बौद्धिक संपत्तीचं पेटंट घेतलं असतं किंवा माझ्या देशाऐवजी व्यवसायावर लक्ष दिलं असतं तर मी इलॉन मस्क पेक्षा जास्त श्रीमंत झालो असतो असंही रामदेवबाबा यांनी म्हटलं.