मुंबई | Pathaan Movie – यावर्षी बॉक्स ऑफिसवर आपली हुकूमत असणारे बॉलिवूड चित्रपट चांगलेच आपटले आहेत. मोठे सुपरस्टार असलेल्या चित्रपटांकडे लोकांनी पाठ फिरवली आहे. अशातच ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा हॅशटॅग प्रचंड व्हायरल झाला आहे. तसंच आता बाॅलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा आगामी ‘पठाण’ चित्रपट अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटातील एका गाण्यामुळे हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे.
नुकतंच ‘पठाण’ चित्रपटातील एक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यावरून सध्या अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हे गाणं शाहरूख खान आणि दीपिकावर चित्रित झालं आहे. तसंच या गाण्यात दीपिका बोल्ड अंदाजात दिसत आहे. मात्र, दीपिकानं या गाण्यात केशरी रंगाची बिकनी परिधान केली आहे आणि गाण्याचे शब्द आहेत ‘बेशरम रंग’. यामुळे हिंदू महासभेनं यावर आक्षेप घेतला आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांच्या मते ‘पठाण’ चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान केला आहे.
या चित्रपटातील शाहरुख दीपिकाच्या केमिस्ट्रीवर देखील नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. दीपिकाची या गाण्यातील अदा या अश्लील पद्धतीनं दाखवण्यात आल्या आहेत असं काहींचं मत आहे. तर हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर काहींनी दीपिकाचं कौतुक केलं आहे. मात्र, अनेकांनी हे गाणे चोरलं असल्याचा आरोप केला आहे. ‘मकीबा’ या गाण्यावरून चोरलं आहे असं अनेकांचं मत आहे. सोशल मीडियावर या गाण्याची खिल्ली उडवली जात आहे.
दरम्यान, शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा प्रदर्शित होणार आहे. जवळपास 4 वर्षांनंतर शाहरूख खान या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या चित्रपटात शाहरुख व्यतिरिक्त जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
View Comments (0)