मुंबई : (Pathan Record Breck Income) बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा पठाण सिनेमा प्रदर्शित होऊन आज नऊ दिवस झाले आहेत. प्रेक्षकांमध्ये पठाण सिनेमाची असलेली क्रेज आजही कमी झालेली नाही. उलट हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन नवीन विक्रम रचत आहे. हाती आलेल्या बातम्यांनुसार गुरुवार अखेर पठाण सिनेमानं जबरदस्त कमाई केली आहे. एका दिवसांतील सिनेमाची ही कमाई पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
बॉक्स ऑफिसवर पठाण सिनेमा दररोज नवीन इतिहास रचत आहे. पठाण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर नवव्या दिवशी संपूर्ण देशातून सिनेमाने १५ कोटी ५० लाख रुपये कमावले आहेत. तर आतापर्यंत पठाणने भारतात ३६४ कोटी रुपये कमावेल आहेत. पठाणने हिंदीमध्ये पहिल्याच दिवशी ५५ कोटी रुपये कमावले होते. तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं ६८ कोटी रुपये तर तिसऱ्या दिवशी ३८ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली होती. तर प्रदर्शित झाल्यानंतरच्या विकेंडला सिनेमानं ११० कोटी रुपयांची जबरदस्त कमाई केली होती.
या आठवड्याच्या प्रारंभी सोमवारी सिनेमानं २५ कोटी ५० लाख रुपये तर मंगळवारी २२ कोटी रुपये कमावले होते. तर सातव्या दिवशी सिनेमाच्या कमाईमध्ये काहीशी उतरण दिसून आली. परंतु नवव्या दिवशी मात्र सिनेमाने दोन आकडी संख्येत कमाई केली. त्यामुळे पठाण सिनेमा येत्या काही दिवसांमध्ये सर्व जुने विक्रम तोडत नवीन विक्रम रचेल असा अंदाज व्यक्त होत आहे.
ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी पठाण सिनेमाच्या नवव्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे जाहीर केले. त्यामध्ये सिनेमानं ७०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाची ही कमाई पाहता शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम यांचा हा सिनेमा लवकरच १ हजार कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होईल, यात शंका नाही.