पवारसाहेब, हा जातीयवाद कायमचा गाडून टाका. सह्याद्रीच्या पायथ्याशी घाला. गोदावरीच्या प्रवाहातून समुद्राला मिळू द्या आणि पौर्णिमेचा चंद्र जो शीतल, शांत प्रकाश पाडतो तो प्रकाश पडू द्या. काहीही करा, पण जातीयवाद गाडून टाका. कारण ती हिंमत तुमच्याजवळच आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात अशीच एक खळबळजनक घटना काल-परवा घडली आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर अनेक प्रश्न थयाथया नाचू लागले. यालाच नियतीचे संकेत असे म्हणतात. देशातील काही ज्येष्ठ बुद्धिवादी, मुत्सद्दी आणि अलौकिक कर्तृत्व गाजवणार्या राजकारण्यांपैकी देशाचे नेते खा. शरदचंद्रजी पवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. खुद्द बारामतीच्या भूमीतच या देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी म्हणाले होते, ‘शरद पवार माझे गुरू आहेत.’ याचा गर्भितार्थ सांकेतिक भाषेत काय असेल माहीत नाही, पण मोदीजींची ही वाणी मात्र वास्तवातील होती.
गेल्या कित्येक वर्षांपासून खा. शरद पवार हे ब्राह्मणांचे द्वेष करणारे राजकारणी आहेत, अशी चर्चा खुद्द ब्राह्मण समाजातच नाही तर अठरापगड जातीत आजसुद्धा आहे. त्याचा पडदा कालच एका पत्रकार परिषदेच्या निमित्ताने खुद्द खा. शरद पवार यांनी केलेल्या विधानावर पडला असेल, अशी चर्चाही जाणकार आणि बुद्धिवंतांत आज सुरू आहे. त्याचे कारण ठरले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अमोल मिटकरी यांनी आपल्या एका भाषणात विवाहाच्या वेळी जे पुरोहित वर्गाकडून मंत्र म्हटले जातात त्याची जाहीर टिंगलटवाळी केली होती.
स्वाभाविक आहे त्याचे प्रतिसादही उमटले गेले आणि ब्राह्मण विरुद्ध मराठा हा गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेला वाद अधिक चर्चिला जाऊ लागला. यासंदर्भात मोकळेपणाने चर्चा करण्यासाठी ब्राह्मण संघाच्या काही संघटनांनी एका मध्यस्थामार्फत खा. शरद पवार यांच्याशी चर्चा करून आपली भूमिका मांडण्याची संधी मिळवण्याचा प्रयत्न केला. मध्यस्थांनी योग्य भूमिका वठवली आणि काल शनिवारी खा. शरद पवार यांनी त्यांना भेटीची वेळ दिली. मंडळातील काही सदस्यांनी पवारसाहेबांच्या पुढ्यात मनातली खदखद मांडली आणि पवार यांनी सदस्यांना आश्वस्त केले की, ज्याने कोणी हे उद्गार काढले आहेत त्यांना योग्य ती समज देण्यात आली आहे.
पवारांच्या या सुमधुर आश्वासनाने ब्राह्मण समाजातील संस्था सदस्यांचे भडकलेले अंत:करण कोमेजून गेले. या चर्चेच्या दरम्यान यातील काही सदस्यांनी दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न पवारसाहेबांच्या पुढ्यात टाकला आणि आर्थिक साहाय्य मिळण्याच्या दृष्टीने ‘परशुराम महामंडळाची स्थापना करावी’ अशी आग्रहाची मागणी केली. या प्रश्नाला उत्तर देताना पवारसाहेबांनी, आपल्या मागणीचा विचार करण्यासाठी मी स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, त्यांच्याबरोबर चर्चा करेन, असे गंभीर स्वरात आश्वस्त केले.
वास्तविक पाहता मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आपल्या एका जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीयवादाला प्रचंड सुरुवात झाली हे केलेले विधान बहुचर्चिले गेले आणि त्यामुळे काही प्रश्नही खा. पवारांपुढे निर्माण झाले असावेत असे वाटते. ब्राह्मण समाजाबाबत, विशेषत: हिंदू धर्माचा एक प्रमुख घटक असलेल्या समाजाबाबत एवढे मोठे सहानुभूतीपूर्वक वक्तव्य खा. शरद पवार यांच्या राजकीय जीवनात आजपर्यंत कधीच आले नव्हते. त्याचे प्रत्यंतर आणि सुखद अनुभव महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने आज घेतला.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात, विशेषत: खेडोपाडी जी आज विकासाची गंगोत्री वाहत आहे त्याला खा. शरद पवार यांनी साखर कारखानदारीला दिलेले उत्तेजन आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर अक्षरश: रस्त्यावर पडलेल्यांना पवारसाहेबांनी देवपण दिले आणि या माणसांना नेतृत्वाचे बाशिंग बांधून निवडणुकीच्या मैदानात उतरविले. कदाचित देवाधर्माविषयी त्यांची संकल्पना वेगळी असेल, पण ते पूर्ण श्रद्धाहीन आहेत हेही शंभर टक्के चुकीचे आहे.
या सगळ्या वास्तवानंतर शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार का नाकारायचा? संत रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, भीमा कोरेगाव येथील झालेली दंगल हिंदूंच्या पुढाकाराने झाली. आज पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील हक्कदार हक्कांना कायमचे वंचित झाले तो बदल श्री क्षेत्र तुळजापूर येथे मात्र दिसून आला नाही, असे कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहेत.
पण दोन दिवसांपूर्वी खा. शरदचंद्रजी पवार यांनी ब्राह्मण समाजाबद्दल जी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली, या त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाला तोड नाही. ‘एक ब्राह्मण, लाख ब्राह्मण’ ही सिंहगर्जना करायलासुद्धा ब्राह्मण एकसंध यायला हवा; परंतु अहंकार आणि विद्वत्तेची मिरासदारी हे आमचे अंगभूत गुण आहेत ही सिद्ध करण्याची भूमिका जोपर्यंत ब्राह्मण समाज सुधारून घेणार नाही तोपर्यंत मराठा समाजातील सर्वोच्च नेतृत्व असलेले शरद पवार तिथे निर्माण होऊ शकणार नाहीत. म्हणून विनंती करावीशी वाटते, ‘पवारसाहेब, हा जातीयवाद कायमचा गाडून टाका. सह्याद्रीच्या पायथ्याशी घाला. गोदावरीच्या प्रवाहातून समुद्राला मिळू द्या आणि पौर्णिमेचा चंद्र जो शीतल, शांत प्रकाश पाडतो तो प्रकाश पडू द्या. काहीही करा, पण जातीयवाद गाडून टाका. कारण ती हिंमत तुमच्याजवळच आहे. ते कसब तुमच्याजवळ आहे, याचेच दुसरे नाव मुत्सद्दी शरद पवार आहे.’