मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी साक्ष नोंदवली. आयोगाने त्यांना काही प्रश्न विचारले असता त्यात त्यांनी काही खुलासे केले आहेत. पवार खुलाशात म्हणाले, लोकप्रतिनीधींनी जाहीर वक्तव्य करताना जबाबदारीनं वागलं पाहिजे. त्यांच्या वक्तव्यात प्रक्षोभक वक्तव्य असता कामा नयेत, जेणेकरून समाजातील विविध स्तरात त्याचे पडसाद उमटून जातीय तेढ निर्माण होईल. जर तसं होत असेल तर त्याची जबाबदारी त्या नेत्याचीच असेल. राजकीय नेते जाहीरपणे बोलतात त्यांच्या वक्तव्यावरून समजात गैरसमज होता कामा नये.
पुढे पोलिस परवानगी वरुन ते म्हणाले, पोलिसांनी अश्या सभांना जागा देताना सर्वसामान्य लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून सभेनंतर तिथं कोणताही तणाव निर्माण झाल्यास पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल. या गोष्टी पोलिस यंत्रणांनी पाळणे गरजेचे आहे.
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी त्यांना तिसरा समन्स प्राप्त झाला होता. त्यांची ही सुनावणी मुंबईत पार पडली. यासाठी ते सकाळीच सह्याद्री रेस्टहाऊसमध्ये दाखल झाले. निवृत्त न्यायमूर्ती जे.एन पटेल आणि आयोगाचे सदस्य सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली पवारांची साक्ष नोंदवण्यात आली.