पुणे : प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी गौरी-गणपती साहित्य जत्रेला सदिच्छा भेट देऊन या उपक्रमाची रंगत वाढवली. सव्वालाखे यांनी काँग्रेस भवन येथे आयोजित गौरी-गणपती साहित्य जत्रेच्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. महिलांनी तयार केलेले कलात्मक वस्तूंचे त्यांनी भरभरून कौतुक केले. स्टॉल्सवरून अनेक वस्तूंची खरेदी करून स्टॉलधारक महिलांचा हुरूप वाढवला.
पायल तिवारी बिटीया फाउंडेशन आणि प्रियदर्शनी वुमन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने संगीता तिवारी यांनी या जत्रेचे आयोजन केले आहे. गौरी-गणपतीनिमित्त सर्व संबंधित वस्तूंची खरेदी ‘वाती ते मूर्ती’ सर्व एकाच छताखाली करता यावी, त्यात दर्जेदारपणा व माफक किंमत असावी आणि महिलांना रोजगार मिळावा, या हेतूने या साहित्य जत्रेचे आयोजन केले आहे. यंदा उपक्रमाचे १३ वे वर्ष आहे. सुमारे ७० ते ८० स्टॉल असून महिला बचत गटांच्या स्टॉलला प्राधान्य देण्यात आले आहे. पूजा आनंद, अरफिक शेख, सुवर्णा माने, पुनीत तिवारी, अंजली सोलापुरे, स्वाती शिंदे, सीमा सावंत, इंदिरा अहिरे व पदाधिकारी उपस्थित होते.
जत्रेत नागरवस्ती विकास योजनेअंतर्गत बचत गटांना समाविष्ट करण्यात आले आहे. उद्या ३० ऑगस्टपर्यंत कॉंग्रेस भवन येथे सकाळी १० ते रात्री १० वेळेत सर्वांसाठी खुले असल्याचे संयोजिका संगीता तिवारी यांनी सांगितले.