पिंपरी चिचवड शहरात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे. यामुळे गुन्हेगाराला कोणत्याही प्रकारचा वचक अथवा दबाव राहिला नाही. मुंबईनंतर स्मार्ट सिटी म्हणून पिंपरी चिंचवड शहराकडे पाहिले जाते. परंतु याच उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणार्या शहरात वरचेवर गुन्हे वाढत असल्याने जणू गुन्हेगारीचे माहेरघर बनते की काय? अशी चर्चा आता नागरिकांतून चर्चिली जात आहे. सामाजिक शांतता राखायची असेल तर त्यावर आता ‘अंकुश’ राहायला हवा, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून होऊ लागली आहे.
पिंपरी ः पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांत सहा खुनाच्या घटना घडल्या आहेत. तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्वप्रथम पोलिस कर्मचारी भरती प्रक्रिया राबवत शहरातील कर्मचारी संख्याबळ वाढविण्यास शासनदरबारी खूप प्रयत्न केले. तसेच गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर विविध वेष परिधान करून खंडणी गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या काळात शहरासाठी पहिली पोलिस भरती झाली. आयुक्तालयाला वाहने मिळवून देणे असो वा विविध पथक सुरू करून संघटित गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्यात आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरात अवैध धंदे बोकाळू दिले नाहीत. ते पूर्ण बंद राहतील, असे त्यांचे प्रयत्न होते. परंतु हे अवैध प्रकार बंद राहिले पाहिजेत, असा त्यांचा प्रयत्न होता. परंतु या गुन्हेगारीला १०० टक्के आळा बसला नाही.
गृह विभागाकड़ून पिंपरी चिंचवड शहरासाठी चार वर्षांत चौथे पोलिस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सध्याचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांची व्हीआयपी सिक्युरिटी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. नक्षल प्रभावित भागातील लोकांना मुख्य प्रवाहात आणणारा आणि प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेला वास्तवातील सिंघम अशी अंकुश शिंदे यांची राज्यात ओळख आहे.
नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हैदराबाद ट्रेनिंगव्यतिरिक्त लंडन येथील गुन्हेगारी आणि तेथील कार्यपद्धतीचा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काय गरजेचे आहे, याचे विशेष ट्रेनिंग घेतले आहे. या ट्रेनिंगचा फायदा सोलापूर आणि अन्य ठिकाणी पोस्टिंग असताना कुणाच्या कशा मुसक्या आवळल्या पाहिजेत, यासाठी शिंदे यांनी केला आहे.
संघटित गुन्हेगारीवर चांगला अंकुश त्यांनी आतापर्यंत ठेवला आहे. सोलापुरातील तत्कालीन नगरसेवकांवर तसेच व्हाईट कॉलर गुन्हेगारांवर त्यांनी केलेली कारवाई कायम चर्चेत राहिली आहे. रात्री-अपरात्री सार्वजनिक रस्त्याच्या कडेला, चौकात बसून गप्पा मारणारे व हुल्लडबाजी करणार्यांवर आयुक्त शिंदे यांनी कारवाई केली होती. तसेच पोलिसांच्या बेशिस्त वर्तनावर त्यांचे विशेष लक्ष असायचे. उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्येही अशाच कारवाईची गरज आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांना मला संपूर्ण आयुक्तालयाची माहिती घेऊ द्या, मग बोलू, असे सांगितले.
त्यानंतर काहीच वेळात त्यांनी कामाला सुरुवात केल्याचे चित्र स्पष्ट झाले. आयुक्त शिंदे यांनी पहिल्याच दिवशी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक बरखास्त केले. आयुक्तालयाची माहिती घेण्यासाठी वरिष्ठ सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकार्यांशी ओळख करून चर्चा करतात. मात्र नवीन पोलिस आयुक्तांनी सर्वप्रथम गुन्हे शाखेच्या अधिकार्यांशी चर्चा करण्याचे ठरवल्याचे बोलले जात आहे.