पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याच्या धमकीचा फोन अन् कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ

पुणे | पुण्यातील गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खुलासा झाल्याने एका जणाला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आले आहे. भावाशी भांडण झाल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगल च्या ऑफिसमध्ये बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन आला होता. गुगल ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये पुण्याचे गुगल ऑफिस उडवून देऊ अशी धमकी एका अज्ञात माथेफिरूने दिली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यामुळे गुगल ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाकडून रविवारी रात्री संपूर्ण इमारतीची तपासणी करून घेतली. यावेळी कुठली ही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्रथामिक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी हैदराबादमधील 45 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पणयम बाबू शिवानंद असं या व्यक्तीचं नाव आहे. त्या व्यक्तीने दारूच्या नशेत कॉल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या व्यक्तीचा भाऊ पुण्यात वास्तव्यास आहे आणि त्या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच गोष्टीचा राग मनात धरून या व्यक्तीने भावाला त्रास व्हावा म्हणून दारूच्या नशेत थेट गुगलचे ऑफिस उडवून देण्याची धमकी दिली.

Dnyaneshwar: