प्राचीन भारतीय विज्ञान आणि आपली विज्ञाननिष्ठ संस्कृतीबद्दल अभ्यासपूर्ण माहिती देणारं हे सदर सुरू होऊन तब्बल २६ आठवडे म्हणजेच अर्ध वर्ष उलटलं आहे. सतीश कुलकर्णी यांच्या मुद्देसूद विवेचनामुळे हे सदर अधिक रंजक आणि वाचनीय झालं आहे. आपल्या वैभवशाली संस्कृतीची वाचकांना माहिती व्हावी या उद्देशाने सुरू केलेल्या या सदराला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या सदराने प्रेरित होऊन एका जरी वाचकाने या विषयात संशोधन केले, तरी या सदराचा उद्देश सफल होईल. –
पुरवणी संपादक
भारतातील काही ज्येष्ठ वैज्ञानिकांनी प्राचीन भारतीय विज्ञानासंबंधी घेतलेल्या दहा प्रमुख आक्षेपांवर आपण चर्चा करत आहोत. आतापर्यंत आपण सहा आक्षेपांची चर्चा केली. आता सातवा आरोप/आक्षेप. ‘अत्यंत विवाद्य अशा विमानशास्त्रामध्ये विमान कसे उडते याचे सैद्धांतिक विवेचन नाही. तसेच विमान कसे बनवायचे याचे सविस्तर वर्णन (मॅन्युअल) नाही. त्यामुळे आमच्या पूर्वजांना विमानविद्येसंबंधी ज्ञान होते, याचा कुठलाही ग्राह्य पुरावा नाही’, हा तो आरोप. प्राचीन विमानांसंबंधी सध्या एक ग्रंथ फारच चर्चेत आहे. तो म्हणजे ‘बृहद् विमानशास्त्र’. या ग्रंथामध्ये तरी विमान कसे उडते याचे सैद्धांतिक वर्णन नाही. त्यामुळे वैज्ञानिकांचा हा आक्षेप मला मान्य आहे. आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रात, १९०५ साली अमेरिकेतल्या राईट बंधूंनी विमान उड्डाणाचे पहिले यशस्वी प्रात्यक्षिक दाखविल्यानंतर आमूलाग्र क्रांती झाली.
त्यानंतर आजपर्यंत विमानशास्त्रावर शेकडो ग्रंथ लिहिले गेले. आधुनिक विमानशास्त्र हे एक अत्यंत गुंतागुंतीचे शास्त्र आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पदार्थविज्ञान (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), धातुशास्त्र (मेटॅलर्जी) आणि गणित या शास्त्रांचा अंतर्भाव असतो. या चारही मुख्य शास्त्रांचे सम्यक ज्ञान असल्याशिवाय विमानशास्त्र कळणेही शक्य नाही. पण प्राचीन विमानशास्त्रामध्ये यापैकी तीन शास्त्रांचे काहीही विवेचन नाही. त्यामुळे आजच्या वैज्ञानिकांचा आक्षेप योग्यच आहे. तसेच विमान कसे बनवायचे याचेही मॅन्युअल नाही, हेही खरेच आहे. पण एवढ्यावरून आपल्या पूर्वजांना विमानविद्येचे ज्ञान नव्हते असा आरोप करणे, हे मात्र या प्राचीन शास्त्रावर घोर अन्याय करण्यासारखे होईल.
महामुनी महर्षी भारद्वाज ऋषींनी ‘यंत्रसर्वस्व’ नावाचा एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथातला ‘वैमानिकशास्त्र’ हा एक भाग आहे. यंत्रसर्वस्व हा ग्रंथ आता उपलब्ध नाही. शेकडो वर्षांपूर्वीच कदाचित तो परदेशी आक्रमणांमुळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असेल किंवा ब्रिटिशांनी चोरून नेला असेल. या ग्रंथावर बोधायन ऋषींनी लिहिलेल्या टीकात्मक (ग्रंथाचे स्पष्टीकरण) ग्रंथाचासुद्धा काही भागच या दुःखद घटनांनंतर शिल्लक राहिला आहे. बोधायन ऋषींनी त्यांच्या टीकात्मक ग्रंथात म्हटले आहे की,
निर्मथ्य तद् वेदाम्बुधिं भरद्वाजो महामुनी।
नवनीतं समुद्घृत्य यंत्रसर्वस्वरुपकम्॥
प्रायच्छत् सर्वलोकानामिप्सितार्थफलप्रदम्।
तस्मिन् चत्वारिंशतिकाधिकारे सम्प्रदर्शितम्॥
नानाविमानवैचित्र्यरचनाक्रमबोधकम्।
अष्टाध्यायैर्विभजितं शताधिकरणैर्युतम्॥
सूत्रै: पंचशतैर्युक्तं व्योमयान प्रधानकम्।
वैमानिकाधिकरणमुक्तं भगवंता स्वयम्॥
अर्थ : महामुनी भारद्वाजांनी वेदरुपी समुद्राचे मंथन करून ‘यंत्रसर्वस्व’ नावाचे असे लोणी काढले आहे, की जे मनुष्यमात्राला इच्छित फल प्राप्त करून देणारे आहे. त्याच्या चाळिसाव्या भागात वैमानिक प्रकरण आहे. त्यामध्ये विमानविषयक रचनेचे अनुक्रम दिले आहेत. हा ग्रंथ आठ अध्यायांमध्ये विभागला असून, त्यात शंभर अधिकरणे आणि पाच सूत्रे येतात.
याचा स्पष्ट अर्थ असा निघतो की, मूळ यंत्रसर्वस्व ग्रंथात विमानरचनेविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती उपलब्ध होती. ही माहिती आज दुर्दैवाने आपल्याला उपलब्ध नसली तरी विविध विमानांच्या रचनांविषयी (Design) आपल्या पूर्वजांना निश्चितपणे ज्ञान होते. इतकेच नाही तर विमानांची रचना, त्यांचे विविध प्रकार याविषयीचे ज्ञान भारद्वाज ऋषींनी वेदरुपी ज्ञानसमुद्रातून वेचलेले आहे, असं बोधायन ऋषी म्हणतात, याचा अर्थ हे ज्ञान भारद्वाज ऋषींच्या आधीही भारतात अस्तित्वात होते, याचा हा स्पष्ट पुरावाच आहे.
विमान विद्येचे (Aeronautics) हे ज्ञान केवळ भारद्वाज ऋषींपाशी होते असे नाही तर भारद्वाज ऋषींनी हा ग्रंथ लिहिताना किती ग्रंथांचा आधार किंवा संदर्भ घेतला आहे, याची एक भलीमोठी यादीच बोधायनांनी दिली आहे. त्यात खालील ग्रंथांचे संदर्भ दिले आहेत. १. नारायणकृत विमानचंद्रिका, २. शोनककृत व्योमयानतंत्र, ३. गर्गकृत यंत्रकल्प, ४. वाचस्पतीकृत यानबिंदू, ५. चाक्रायणीकृत खेट्यायानप्रदीपिका, आणि ६.धुण्डिनाथकृत व्योमयानार्कप्रकाश या ग्रंथांचा समावेश आहे. याखेरीज ‘अगस्त्य विमान संहिता’ हा अगस्ती ऋषींचा विमानशास्त्रावरचा ग्रंथ आहे. व्योम याचा अर्थ आकाश. व्योमयान म्हणजे आकाशातून जाणारे वाहन म्हणजे विमानच होय. तसेच खेटयान याचाही अर्थ विमान हाच आहे. म्हणजे वरील सगळे ग्रंथ हे केवळ विमानविद्येवर लिहिलेले ग्रंथ होते आणि विमानविद्येतील सगळ्या अंगांचा (aspects) विचार या ग्रंथांमध्ये झाला असला पाहिजे. सगळे अंग म्हणजे विमानांचे विविध प्रकार, त्यांची रचना, त्यांना लागणारे इंधन आणि या वेगवेगळ्या इंधनांचे प्रकार, विमानांच्या बांधणीसाठी लागणारे विविध प्रकारचे धातू , वैज्ञानिकांची पात्रता, त्यांनी घ्यावयाची खबरदारी, विशेषतः खराब वातावरणात विमानांचे सारथ्य अशा सर्व बाबींचा या ग्रंथांमध्ये विचार झाला असला पाहिजे.
हा माझा केवळ कल्पनाविलास नाही, तर पुढे आपण याबाबतीत आणखी जे जाणून घेणार आहोत त्यावरून हे स्पष्ट होईल. वैदिक काळानंतर अगदी ११ व्या शतकापर्यंत विमानविद्येवर ग्रंथ लिहिले जात होते. ११ व्या शतकातील माळव्याचा राजा भोज हा नुसताच राजा नव्हता तर अतिशय हुशार, प्रज्ञावंत अभियंताही होता. त्याचा ‘समरांगणसूत्रधार’ हा ग्रंथ मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनीअरिंगचे एक उत्कृष्ट पाठ्यक्रम पुस्तक म्हणता येईल, असा ग्रंथ आहे. यंत्रांच्या विविध भागांची नावे, त्यांचे उपयोग, विविध यांत्रिक रचना आणि स्थापत्यशास्त्रावरची उपयुक्त माहिती या ग्रंथात आहे. यांत्रिक खेळणी, यंत्रमानव यावरचीसुद्धा गमतीशीर माहिती या ग्रंथात सापडते. ‘यंत्राध्याय’ नावाच्या प्रकरणात विमानविद्येचीही उपयुक्त माहिती आहे. राजा भोज हा एक हुशार इंजिनीअर होताच, पण तो अगदी आजच्या काळातल्या एखाद्या आय.आय.टी.मध्ये शोभेल असा इंजिनीअरिंगचा प्राध्यापकही असावा. सगळ्या गोष्टी किंवा युक्त्या मी तुम्हाला सांगणार नाही, त्या तुम्ही प्रयत्न आणि अभ्यास करून तुम्हीच शोधल्या पाहिजे, असा त्याचा आग्रह होता.
‘समरांगणसूत्रधार’ या त्याच्या ग्रंथातले काही श्लोक पाहा… यंत्राणामाकृतिस्तेन निर्णेतुं नैव शक्यते। यथावन्हिजसंयोग: सौश्लिष्ट्यं श्र्लक्ष्णतापिच॥ श्लोक ४५. अर्थ :- (या आधीच्या श्लोकांमध्ये यंत्रबीजाविषयी (prime mover) माहिती दिल्यानंतर या श्लोकात केवळ हे जाणल्यानंतर यंत्राचे चित्र/आकृती (drawing) काढता येत नाही, असे म्हटले आहे.) यापुढे ७९ व्या श्लोकात म्हटले आहे की,॥ पारंपर्यं कौशल्यं सोपदेशं शास्त्राभ्यासो वास्तुकर्मोद्यमो धी। सामग्रीयम् निर्मला यस्य सोsस्मिंश्रि्चत्राण्येवं वेत्ति यंत्राणि कर्तुम॥ अर्थ:- परंपरा (back history), कौशल्य, मार्गदर्शन, त्या शास्त्रांचा अभ्यास, तुमची बुद्धी (धी:), उत्कृष्ट सामग्री(निर्मला) जिच्या सहाय्याने यंत्राच्या आकृतीप्रमाणे ( as per design &drawing) या सर्वांचा योग्य उपयोग करून यंत्र बनवावे. इंजिनीअरिंग कॉलेजमधले प्राध्यापक यापेक्षा वेगळे असे काय त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवितात? आणि शेवटी राजा भोज म्हणतो, दुष्करं यद्यदन्यच तत्तद यंत्रात् प्रसिध्यति यंत्राणाम घटना नोक्ता गुप्त्यर्थं नाज्ञतावशात॥ (या तंत्रज्ञानानने) अनेक कठीण कामे करून घेता येतात.
पण यंत्राची घटना (design/technology) हे अज्ञानामुळे नाही तर गुप्ततेसाठी (secrecy) दिली नाही. trade secret ही संकल्पना कदाचित भोजराजाने सुरू केली असावी. आजच्या वैज्ञानिकांनी प्राचीन विमानशास्त्रांत विमान कसे उडते याचे सैद्धांतिक वर्णन नाही किंवा विमान कसे बनवायचे याचे तपशीलवार वर्णन नाही हा जो आरोप केला आहे, त्याचे स्पष्टीकरण भोजराजाने दिले आहे. ज्या अतिप्राचीन वैदिक संस्कृतीमध्ये फक्त विमानशास्त्रावर सहा किंवा कदाचित याहीपेक्षा अधिक ग्रंथ लिहिले गेले, त्यांच्यामध्ये ग्रंथकर्त्यांनी केवळ कविकल्पनांचा बाजार मांडला आहे, असे म्हणणे कितपत योग्य आहे? शेवटी, या प्राचीन विमानशास्त्रावर आधारित ज्ञानावर सध्या काही संशोधक काय संशोधन करीत आहेत, याची माहिती पुढच्या लेखात घेऊ.
(क्रमशः).
(या संदर्भातील अधिक माहितीसाठी लेखकाशी ९८२२०६४७०९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
सतीश ब. कुलकर्णी