पुण्याहून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने सरळ सातारा गाठले आणि तेथूनच औद्योगिक वसाहतीतून रहिमतपूर-पुसेसावळीचा रस्ता पकडला. रहिमतपूरपासून पुढे एक लहानसा घाट चढल्यानंतर डावीकडे आैंध संस्थानच्या राजधानीचे आैंधगाव दिसले.
सरळ आमच्या टू-व्हिलर्स आैंधच्या दिशेने वळवल्या आणि आैंध गाव येण्यापूर्वीच उजवीकडे यमाई टेकडीवरचा रस्ता कापू लागल्या.
प्रथम सर्वात वरती जाऊन यमाई टेकडीवरील श्री यमाई देवीचे दर्शन घेतले आणि मग आमच्या दुचाक्या पार्क केल्या, त्या श्री भवानी वस्तू संग्रहालयाच्या पाकिर्ंंग लॉटमध्ये. कै. श्रीमंत भवानराव ऊर्फ बाळासाहेब महाराज पंतप्रतिनिधी (आैंधचे राजे) हे उत्तम कलाप्रेमी आणि स्वतः एक कलाकार होते. त्यांनी अनेक कलाचित्रांचा, शिल्पकलेच्या भांड्यांचा, शस्त्रास्त्रांचा आणि धार्मिक पुस्तकांचा संग्रह करून ठेवलेला आहे. सर्वसामान्य जनतेला या सर्वांचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी सन १९३८ साली श्रीभवानी संग्रहालय व ग्रंथालयाची स्थापना केली.
या संग्रहालयात १२००० पेक्षा अधिक वस्तूंचा आणि १६००० हून अधिक दुर्मीळ पुस्तकांचा समावेश आहे. श्रीमंत बाळासाहेब महाराजांनी संग्रहालयशास्त्राचा अभ्यास करून परदेशी वास्तुशास्त्रज्ञांच्या मदतीने नैसर्गिक सूर्यप्रकाश, खेळती हवा आणि संरक्षण या गोष्टी विचारात घेऊन सध्याची संग्रहालयाची इमारत स्थापन केली. जिल्ह्यातील ग्रामीण भागांत इतक्या मोठ्या प्रमाणात विविध शिल्पांचे आणि वस्तू संग्रहित करणे म्हणजे एकप्रका नवलच वाटण्यासारखे आहे.
संग्रहालयाची विस्तारित इमारत आणि तेथे असलेली सौर दिव्यांची प्रकाशयोजना येणार्या प्रत्येकाला भुलवून टाकते. निसर्गरम्य उद्यानात सभोवतालच्या दुष्काळाचा लवलेशही दिसत नाही. संग्रहालयात प्रवेश केल्यानंतर आपण कोणत्या विश्वात, कोणत्या देशात आहोत, असाच प्रश्न पडावा, इतक्या नयनरम्य कलाकृती अत्यंत देखण्या व्यवस्थापनात जतन केलेल्या आढळतात.
राजा रवि वर्मा, ठाकूरसिंग यांची मूळ चित्रे, चंदनाच्या दरवाजांवरील कोरीव शिवचरित्र, चंदनाच्या दरवाजांवरील कोरीव रामायण, कर्निल, अन्द्रीडील, सोर्तोबार्दना, फ्रान्सीस गोया, चैरासी फ्रांक, इस्टमन मिस्त्रुथ, जोनेस बेरो आदी जगप्रसिद्ध कलाकृती येथे आहेत. रोड टू पॅरिस, व्ह्यूज ऑफ व्हिनस, बॉय व्हॉलटीअर, सनसेट, फायनल मिल, मॉडेल्स ऑफ मोनालिसा, मदर-बेबी आणि वर्जिन वुमन अशी सर्वोत्तम शिल्पे, रनिंग मर्क्युरी, कामदेव,अग्निदेव आदी ब्राँझ शिल्पे अशा हजारो कलाकृतींनी हे संग्रहालय सजले आहे.