भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. त्यानुसार, प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर २ ते ९ डिसेंबरपर्यंत निर्बंध घातले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळं रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्रचंड गर्दी होते. अनुयायांची गैरसोय टाळून प्लॅटफॉर्मवरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसंच स्थानक परिसरात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटले आहे.
या स्थानकांचा समावेश
मध्य रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर २ डिसेंबर पासून ते ९ डिसेंबर पर्यंत बंदी राहणार आहे. यात मुंबईतील महत्त्वाच्या स्थानकांसोबतच इतर जिल्ह्यातील स्थानकांचा देखील समावेश आहे. प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद असलेल्या मुंबईतील स्थानकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण स्थानकाचा समावेश आहे. तर, मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजन अंतर्गत येणाऱ्या बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.