विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या 6 दिवसांत 8 सभा

PM Narendra Modi | मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र अद्याप निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या नसल्या तरी राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये एनडीए विरूद्ध इंडिया असा सामना प्रथमच होत असल्याने ही आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालिम असल्याचे मानले जात आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) स्वत: इलेक्शन मोडवर आले असून 5 पैकी 4 राज्यांमधील त्यांचा दौरा जाहीर झाला आहे.

या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीला यश मिळाल्यास 2024 ची लोकसभा निवडणुक भाजपला कठिण जाऊ शकते. यासाठी पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी भाजप आत्तापासूनच अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. 

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून मैदानात उतरणार आहेत. येत्या सहा दिवसांत म्हणजेच सोमवार ते शनिवार या काळात पीएम मोदी छत्तीसगड, तलंगणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांमध्ये सभा घेणार आहेत. शनिवारी छत्तीसगडमधील बिलासपूरच्या भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या समारोप सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. येथे ते परिवर्तन महासंकल्प रॅलीला संबोधित करतील. तर या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहेत.

तर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 1 ऑक्टोबरला ते महबूबनगर जिल्ह्याचा दौरा करतील. त्यानंतर 3 ऑक्टोबरला निजामाबादला पोहोचतील. दोन्ही ठिकाणी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. तसेच जाहीर सभांनाही संबोधित करतील. तेलंगणात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑक्टोबरला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला भेट देतील. तेथे त्यांच्या दोन जाहीर सभा होतील. 5 ऑक्टोबरला मोदी पुन्हा मध्य प्रदेश दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. जबलपूर आणि जगदलपूरमध्ये ते जाहीर सभा घेऊ शकतात. 2 ऑक्टोबर रोजी पीएम मोदी राजस्थानच्या चित्तोडगडमध्येही जाहीर सभा घेणार आहेत. 5 ऑक्टोबर रोजी ते पुन्हा राज्यात येतील आणि जोधपूरला भेट देतील.

Sumitra nalawade: