पालिका शाळांचे कॅमेरे ‘ नजरबंद’…!

एका महिन्यात सीसीटीव्ही बसवा अन्यथा मान्यताच रद्द

पुणे: खासगी शाळांना सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी उपदेशाचे ‘ डोस’ पाजत असलेल्या महापालिका प्रशासनाच्या शाळांचीच अवस्था अतिशय बिकट असल्याची धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे, शहरातील पालिकेच्या बहुतांशी शाळांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरेच बसविण्यात आले नाहीत. विशेष म्हणजे ज्या शाळांमध्ये कॅमेरे आहेत त्यांची देखभाल आणि दुरुस्तीच न झाल्याने ते ‘ नजरबंद’ अवस्थेत आहेत. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा जबरदस्त फटका विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सहन करावा लागत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे.
 गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत शहरातील काही शाळांमध्ये विद्यार्थी आणि विशेषत: विद्यार्थींनीवर लैगिक अत्याचाराच्या गंभीर घटना घडल्या आहेत, त्यातूनच विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने या खासगी शाळांच्या संस्था चालकांवर आतापर्यंत नेहमीच आगपाखड करण्यात आली असून त्यामध्ये महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीच आघाडीवर असल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी कर्वेनगर येथील एका शाळेमध्ये नृत्य शिक्षकाने विद्यार्थ्यांवर लैगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते, त्यावेळीही महापालिका प्रशासनाने त्यामध्ये आघाडी घेत संबधितांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले होते. महापालिका प्रशासनाचा हा निर्णय योग्य असल्याचे प्रशस्तीपत्र अनेक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी दिले होते.
 मात्र; हे वास्तव असतानाच महापालिका प्रशासनच त्यांच्या शाळांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या शहर, उपनगर आणि समाविष्ट गावांमध्ये अशा मिळून शंभर ते सव्वाशे शाळा असून या शाळांमध्ये ८० ते ८५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनी हे सर्वसामान्य कुटुबांतील आहेत, हे वास्तव असतानाही त्यांना शाळांमध्ये सुरक्षा मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाने शाळांमध्ये आतापर्यंत कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. विशेष म्हणजे काही नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डस्तरीय निधीतून त्या त्या भागातील शाळांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र; गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासकराज सुरु आहे. त्यामुळे या कॅमेर्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे काम प्रशासनाचे होते.

हे वास्तव असतानाही महापालिका प्रशासनाने त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची कोणतीही कामे केली नाहीत, त्यामुळे हे कॅमेरेच सध्या बंद अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे ज्या कॅमेर्यांवर धूळ साचली आहे, त्यावरील धुळ झटकण्याची साधी तसदीही शाळा प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे हे कॅमेरे असून नसल्यासारख्या अवस्थेत आहेत, त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून त्यांची सुरक्षाच धोक्यात आली आहे. या सर्व बाबींची जाणीव असतानाही आणि विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाही महापालिका प्रशासन या गंभीर बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.

Rashtra Sanchar Digital: