‘एचएमपीव्ही’चा धोका वाढताच महापालिका ॲक्शन मोडवर

पुणे  : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) HMPV या साथरोगाचा धोका वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या धर्तीवर शहरात रुग्णालयात विलगीकरणासाठी रुग्णशय्या आणि अतिदक्षता रुग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रुग्ण आढळल्यानंतर व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Health Department) दिली.

महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचएमपीव्हीचा संसर्गाबाबत खबरदारीची पावले उचलली आहेत. कोरोना साथीनंतर महापालिकेने भविष्यात संसर्गजन्य आजाराची साथ आल्यास रुग्णालयात रुग्णशय्यांची व्यवस्था केली आहे. भविष्यात एचएमपीव्हीची साथ वाढल्यास त्यासाठी महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयात विलगीकरणासाठी रुग्णशय्यांची व्यवस्था आहे. याचबरोबर रुग्ण वाढल्यास खासगी रुग्णालयांची मदत घेऊन विलगीकरणासाठी व्यवस्था करण्याचे महापालिकेचे (PMC ) नियोजन आहे.

Rashtra Sanchar: