‘सजग नागरिक मंच’च्या वतीने चर्चासत्र
पुणे : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रस्त्यावर चार हजारांहून अधिक बस आवश्यक असताना केवळ सोळाशे बस धावत असल्याने नागरिकांना सुरक्षित आणि सक्षम वाहतूक व्यवस्था पुरवण्यात पीएमपी प्रशासन कमी पडत असल्याचे मत वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे यांनी व्यक्त केले.
“सार्वजनिक वाहतूक, पीएमपीएमएल व प्रवासी हित’ या विषयावर सगज नागरिक मंचाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात देशपांडे बोलत होत्या. यावेळी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर, पीएमपी प्रवासी मंचाचे सचिव संजय शितोळे उपस्थित होते.शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे आवश्यक आहे. पीएमपीचा मूळ हेतू हा नफा-तोटा न बघता सार्वजनिक सुविधा पुरवणे हा असला पाहिजे; पण पीएमपी आपला हेतूच विसरत चालली आहे.तसचे सध्याचा हेतू हा प्रवासीकेंद्रित नसल्याने प्रवाशांची संख्या मागच्या काही वर्षांपासून तेवढीच आहे. ई-कॅब सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी सुटणार नसून, यात आणखी भरच पडणार आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ई-कॅब सुरू करण्याऐवजी बसची संख्या वाढविल्यास प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल.
शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी शहरातील सार्वजनिक वाहतूकव्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे. एक लाख लोकसंख्येमागे ५० बस आवश्यक असताना सध्या याची संख्या खूपच कमी आहे. प्रवाशांना सक्षम, सुरक्षित आणि स्वस्त वाहतूकव्यवस्था उपलब्ध नाही, हे पुणेकरांचे दुर्दैव आहे. — संजय शितोळे
पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांना जोडण्यासाठी फर्ग्यूसन कॉलेज रस्ता, जंगली महाराज रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता खूप महत्वाचे असल्याने या मार्गावरील सार्वजनिक वाहतूक वाढविणे आवश्यक आहे.