रांजणगावला अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीएचा हातोडा

रांजणगाव गणपती- Pune Rural News | रांजणगाव गणपती येथील संकल्प सिटी या ठिकाणी गट नंबर ११११ आणि ११३४ येथे पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागामार्फत वाणिज्य स्वरूपाचे सुमारे ४५०० स्क्वेअर फूट आणि शिक्रापूर येथील गट नंबर ८११ आणि ८१२ येथे साधारणपणे ५५०० स्क्वेअर फुटाचे असे एकूण १००० चौरस फुटाचे वाणिज्य वापराकरिता बांधण्यात आलेले अनधिकृत बांधकाम, तसेच अनधिकृत हॉटेल पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निष्कासन विभागामार्फत पाडण्यात आले.

एकाच दिवशी पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम विभागामार्फत दोन ठिकाणी यशस्वीपणे निष्कासन कारवाई करण्यात आली. निष्कासन कारवाई तीन पोकलेन यांच्या साहाय्याने करण्यात आली.

साहेब, कोणाकडे न्याय मागायचा?
पीएमआरडीएच्या कारवाईबाबत सर्वसामान्य लोकांनी नाराजी व्यक्त केली. अनेक कामगारांनी रांजणगाव, शिक्रापूर या ठिकाणी पै, पै गोळा करून एक गुंठा, दोन गुंठे जागा विकत घेतली. जवळ पैसे नसताना बँक, पतसंस्था, खासगी सावकार यांच्याकडून कर्ज काढून इमारती उभ्या केल्या; परंतु पीएमआरडीएचे अधिकारी मात्र बड्या धेंडांना सोडून सर्वसामान्य लोकांच्या बांधकामावरच हातोडा चालवत आहेत. तसेच पी एम आर डी ए च्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारुनही अधिकारी कधीच वेळेवर भेटत नाहीत. त्यामुळे आम्ही गरिबांनी नक्की कोणाकडे दाद मागायची, असा सवाल यावेळी काही बांधकामधारकांनी उपस्थित केला.

या कारवाईच्या वेळेस रांजणगाव गणपती येथील संकल्प सिटी येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या वतीने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी पीएमआरडीएचे नियंत्रक तथा अनधिकृत बांधकाम विभाग सहआयुक्त बन्सी गवळी यांनी परवानगीशिवाय कोणतेही अनधिकृत बांधकाम करण्यात येऊ नये असे आवाहन केले, तसेच परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केल्यास संबंधित बांधकाम धारकाकडून अनधिकृत बांधकाम निष्कासन खर्च वसूल केला जाईल, असे सांगितले. यावेळी पीएमआरडीए अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Dnyaneshwar: