देवेंद्र फडणवीस – अजित पवार हे रसायन उपयोगी
-मधुसूदन पतकी
राज्याला समृद्ध, विकसित करायचे असेल तर सध्या जे राजकारण म्हटले जाते ते बाजूला ठेवले पाहिजे. राजकीय शह-काटशह कितपत आणि कसे आचरणात आणायचे, हे पण ठरवले पाहिजे. यासाठी मुद्दा पॉलिटिकल इंजिनिअरिंगचा येतो. सगळ्या पक्षातील खरोखर विचार आणि विचार अमलात आणण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींनी एकत्र येत राज्याच्या विकासाचे प्रारूप बनवले पाहिजे.
सध्या राजकारणाचा पोत फाटा पॉलिटिकल इंजिनिअरिंग करणे आता आवश्यक झाले आहे. राजकारण वेगळे आणि विकास, रोजगार, शेती, शिक्षण, आरोग्य, आर्थिक असे विषय वेगळे याचे आकलन आता राजकारणी मंडळींना होणे आवश्यक आहे. आपण ज्यांच्या साठी सत्तेत येतो, ज्यांना एक दिवसाचा राजा मानतो त्या जनतेला, मतदारांना किमान सुख-सोयी द्याव्यात हा अगदी प्राथमिक विचार आणि कृती आता आवश्यक आहे. कोविडनंतर एवढेसुद्धा शहाणपण आपल्याला आले नसेल तर आपल्या बुद्धिमत्तेचे दिवाळे निघाले असे मानावे लागेल.
दररोज काही तरी प्रश्न, आरोप, प्रत्यारोप आणि राजकारणापेक्षा द्वेषाचा दर्प असलेले कारनामे आणि विचार याशिवाय सध्या काही पाहायला ऐकायला मिळत नाही. राजकीय विचारधारा काहीही असो देशप्रेम, समाजातल्या अंतिम व्यक्तीचा विकास, तात्त्विकता, साधनशुचिता या बाबींचा सगळ्यांनीच हरताळ फासायचा ठरवल्याप्रमाणे सध्या काम सुरू आहे. सत्ता हे साध्य नाही, तर साधन आहे हे मानायला कोणी तयार नाही. त्यात राज्याचे, व्यक्तींचे किती नुकसान होते, याची कोणाला फिकीर नाही. सध्या वेदांतवरून जोरदार चर्चा सुरू आहे. राज्याला समृद्ध, विकसित करायचे असेल तर सध्या जे राजकारण म्हटले जाते ते बाजूला ठेवले पाहिजे. राजकीय शह -काटशह कितपत आणि कसे आचरणात आणायचे हेपण ठरवले पाहिजे. यासाठी मुद्दा पॉलिटिकल इंजिनिअरिंगचा येतो. सगळ्या पक्षातील खरोखर विचार आणि विचार अमलात आणण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींनी एकत्र येत राज्याच्या विकासाचे प्रारूप बनवले पाहिजे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे रसायन त्यासाठी राज्याला उपयोगी आहे. व्यापक जनहितासाठी फडणवीस आणि पवार यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. प्रशासनावर ताबा, त्यांच्याकडून काम करून घेण्याचे कसब, रोखठोक भूमिका, स्पष्टवक्तेपणा हे गुण अजित पवार यांच्याकडे आहेत, तर फडणवीस हुशार, अभ्यासू, दूरदृष्टी ठेवणारे, चतुर, धोरणी आणि कमालीचे थंड डोक्याने काम करणारे आहेत. सांगड घालणे आणि काम करून घेणे हे गुण दोघांच्यात आहेत. भाजप-सेनेमधील सुधीर मुनगंटीवार, चन्द्रशेखर बावनकुळे, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, तर काँग्रेस-राष्ट्रवादीतील जयंत पाटील, राजेश टोपे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण अशा मंडळींनी एकत्र येऊन राज्यचा विचार केला पाहिजे. सगळे भ्रष्ट आहेत, राज्य करण्यास लायक नाहीत, हे सगळे पक्ष एकमेकांना सांगत असतील तर मतदार, जनतेने आशेने कोणाकडे पाहायचे? खरेतर हे सांगणे कल्पनाविलास वाटेल, मात्र आज फडणवीस आणि अजित पवार एकत्र येण्याची गरज आहे.
राज्यातली सक्षम व्यक्ती पक्षीय, वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र यायला पाहिजेत. युवकांचे मसीहा आहोत हे सांगून युवकांना रस्त्यावर आणून आंदोलन करण्यापेक्षा रस्त्यावर शासन, प्रशासनाने येऊन सगळ्यांसमोर विकासाचे प्रारूप मांडून त्यात युवकांना सहभागी करून घ्यावे. दररोज आंदोलने आणि वेगळ्या विषयावर एकमेकांची उणीदुणी काढून सगळे एकाच माळेचे मणी की मनी आहेत, हे किमान दाखवू नका एवढेच सांगणे. यासाठी पॉलिटिकल इंजिनिअरिंग आवश्यक आहे. निवडणुकीत जाती आणि धर्माचे सोशल इंजिनिअरिंग करून जातीभेद वाढवणाऱ्या प्रशांत किशोर यांना राजकीय नेते महत्त्व देत असतील तर विभाजनाचा मुद्दा अधिक तीव्र, धारदार आणि टोकदार होणार आहे. यावर फडणवीस, पवार, चव्हाण एकत्र येत राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून काम केले पाहिजे.
युवकांना राजकारणाच्या साठमारीत रस नाही. ज्यांना आहे तो विधायक नाही. कोविडमुळे आजही आपण सावरलो नाही. गरीब आधी गरीब आणि श्रीमंत आणि पैसे मिळवण्याची ज्याला संधी तो अधिक श्रीमंत होतो आहे. यावर काही पर्याय शोधला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. देशाच्या या कालखण्डाचे १९४७ पर्यंत १९४७ ते २०१९ आणि २०१९ कोविड उत्तर असे विभाजन केले पाहिजे.