औंध : अनेक ठिकाणी खांबांवर फलक लावून अनेकांकडून शहर विद्रूपीकरण सुरू आहे. यात राजकारणीसुद्धा मागे राहिले नाही. बालेवाडी, औंध, बाणेर अशा अनेक ठिकाणी अनधिकृतपणे बॅनर, पोस्टर लावण्याचा प्रकार सुरू आहे. एकही खांब असा नसेल की, त्यावर बॅनर लावलेले नसेल.
बाणेरमधील भैरवनाथ यात्रेदरम्यान जागोजागी स्वागताचे बॅनर लावून विद्रूपीकरण केले जात असताना मनपा काय करते? औंध क्षेत्रीय विभागाकडून जाहिरात फलकाद्वारे विद्रूपीकरण करू नये, असे आवाहन केले होते. दंडात्मक आणि फौजदारी कारवाईची तंबीही दिली होती.
ही बाब खरी आहे की, मनपाकडूनच बॅनरबाजीला अभय मिळत आहे. जनता किंवा पूढारी काही कार्यक्रम असले की, रस्त्यावर येऊन खांबांवर बॅनरबाजी करतात. शहराचे विद्रुपीकरण नगरसेवक व राजकीय पुढारी यांच्याकडूनच जास्त होत आहे. अनेक भिंतीवर जागोजागी स्टीकर चिकटविले जातात आणि जाहिरात केली जाते. यावर पत्ते असतात, मग यांच्यावर कारवाई का होत नाही. हे फक्त नावापुरतेच आहे. वसुली द्या, मग काही करा, असा प्रकार मनपाकडून घडताना दिसतो.
डॉ. देशमुख, पॅन काड क्लब रोड बाणेर
आजही बाणेर, बालेवाडीत नगरसेवकांचे बॅनर खांबांवर उभे आहेत. मग यावर फौजदारी कारवाई होईल काय, असा जनता मनपाला प्रश्न करीत आहे. मनपाचे अधिकारी काही लोकांना पाठीशी घालत आहेत, असेही दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बिल्डरचे प्लॉट विक्री, गुंठेवारी विक्री, तर काही ठिकाणी नगरसेवकाकडून आभाराचे बॅनर लागतात. याला काही बंधने आहे की नाही? अनेक भिंतींवर, शौचालयाच्या ठिकाणी, बागेतील भिंतीवर, एमएसईबीच्या डीपीवर नोकरभरती, घरबसल्या पॅकिंग करा हजारो रुपये कमवा, घरकामगार, कारखाना कामगार पाहिजे असे अनेक स्टीकर चिकटवलेले असतात. त्यावर मोबाइल नंबर लिहिलेला असतो. मग यांच्यावर कधी कारवाई होते काय?