राजकारण हाच धर्म…

राम, कृष्ण, सोमनाथ आणि या देवदेवतांशी संबंधित पौराणिक इतिहास नीट वाचता येण्याएवढी साक्षरता आणि समतोल विचारधारा निर्माण करण्याचे मोठे आव्हान खरेतर आपल्या शिक्षणपद्धतीसमोर आहे. अर्थात, या शिक्षणपद्धतीवरही भगवा, हिरवा असे रंग दिले जात असल्याने ते न देण्याची सुबुद्धी राम-कृष्णच अशा मंडळींना देवो.

हा आठवडा न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालांमुळे इतिहासात नोंद केला जाईल, असा ठरतो आहे. मध्य प्रदेशला दिलेले ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचा निकाल ज्ञानवापीच्या सुनावणीवर मिळत असलेल्या तारखा आणि मथुरेत कृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीदवादावर खटला चालविण्यास दिलेली परवानगी हे सगळे निर्णय अत्यंत महत्त्वाचे आणि राजकीयदृष्ठ्या कळीचे ठरणार आहेत. रामकृष्ण, हिंदू-मुस्लिम, तसेच अन्य धर्माबाबत राजकारण करू नये, असे सर्वच पक्ष म्हणत असले तरी धर्मातल्या अनेक मुद्द्यांवर राजकारण करण्याचा धर्म राजकीय पक्ष आणि नेते कसोशीने पाळत असतात. निवडणूक प्रचाराचा झंझावात कोणे एकेकाळी शेवटच्या चार-सहा महिन्यांत निर्माण होत असे. त्यातूनही लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात देशभरात वातावरण निवडणूकमय होत असे.

मात्र आता राज्याच्या निवडणूक, महापालिकांच्या निवडणुका याही अत्यंत अटीतटीच्या आणि देशव्यापी लक्ष देण्याजोग्या ठरत आहेत. प्रचाराचे तंत्र, विविध मुद्दे त्याची राजकीय जाहीरनाम्यात घातलेली सांगड आणि हे मुद्दे स्थानिक नसून, राष्ट्रीय आहेत, यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे, हे बिंबविण्यात यशस्वी झालेले पक्ष अशा एका आवर्तनातून सध्या देश चालला आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राज्याची विधानसभा निवडणूक होत असते आणि त्याचा परिणाम देशातल्या आणि महत्त्वाच्या शहरांवर होईल, याची काळजी घेतली जाते. साहजिकच त्यासाठी आवश्यक असणारे मुद्दे अक्षरशः उकरून काढले जातात आणि ते उकरून काढण्यासाठी धर्म हा सर्वात प्रभावी आणि परिणामकारक मुद्दा असल्याने यासंदर्भातील विषय एनकेनप्रकारेण चर्चेत राहतील, अशी व्यवस्था केली जाते. राम-कृष्ण सोमनाथ म्हणजेच शैव आणि वैष्णव या दोन भागांत विभागलेला समस्त हिंदू धर्म या मुद्द्यांवर एकत्रित येतो वा आणला जातो. वाराणसी येथील ज्ञानवापी परिसरात सुरू असलेले सर्वेक्षण आणि त्याअनुषंगाने सध्या ढवळून निघत असेलली सामाजिक मानसिकता याचा परिणाम राजकारणावर नक्कीच होतो.

एका प्रकरणाबरोबरच मथुरा येथील कृष्णजन्मभूमीसंदर्भातील वादही सुरू झाला आहे, तर रामजन्मभूमीचा विषय महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांच्यातील मतमतांतरामुळे धगधगत आहे. राम मंदिर झाकी है, मथुरा अभि बाकी है या घोषणा धार्मिकता आणि त्यासंदर्भातील अस्मिता बांधून ठेवण्यासाठी उपयोगात आणल्या जात आहेत. खरेतर पी. व्ही. नरसिंहराव सरकारच्या काळात देशातील सर्वच धर्मस्थळांचेही, प्रार्थनास्थळांची स्थिती देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यादिवशीची म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ रोजी जशी होती तशीच ठेवण्यासाठी कायदा करण्यात आला होता. हा कायदा आजही लागू आहे. असे असताना या कायद्याच्या वैधतेला हे सगळे विषय आणि त्यासंदर्भात केल्या जाणार्‍या याचिका आव्हान देत आहेत. हे आव्हान असेल तर आणि त्यावर सनदशीर मार्गाने कार्यवाही होत असेल तर, १९९१ मध्ये नरसिंहराव यांच्या काळात झालेल्या या कायद्याचा उपयोग काय? अयोध्येचा प्रश्न मार्गी लागतो आहे, असे लक्षात आल्यावर अशाच संदर्भातील जे प्रश्न प्रलंबित आहे ते प्रश्न पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेपुढे आणले जात आहेत.

साहजिकच हे विषय जर सामोपचाराने संपवायचे असतील तर नरसिंहराव यांच्या काळात तयार केलेल्या कायद्याची आवश्यकता भासणार नाही. मात्र दोन्ही पक्षातील टोकाची आग्रही विचारधारा समाजापुढे मांडणारी मंडळी सार्वजनिकरीत्या या प्रश्नांवर मत व्यक्त करतात, तेव्हा समाजाची घडी विस्कटायला वेळ लागणार नाही. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे संघर्षाने मिळालेले आहे, यात अनेक जात -पात, धर्म, पंथाच्या मंडळींनी लढा दिला आहे आणि १५ ऑगस्ट १९४७ नंतर या सर्व मंडळींना आपण भारतीय म्हणून आपल्या देशात समाविष्ट करून घेतले आहे. अशा वेळी इतिहासातील आवश्यक आणि आपल्याला अपेक्षित तेवढेच दाखले बाजूला करून अथवा घेऊन त्यावर चर्चा करीत राहणे हे मनभेदाकडे नेण्याचे लक्षण आहे. भूतकाळ किंवा इतिहास आपल्या समरणात असणे आवश्यक आहे, तो विसरता कामा नये, मात्र वर्तमानात आपल्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी त्याचा यथायोग्य वापर आपल्यला करता आला पाहिजे.

तसे न करता केवळ आपल्या विचारधारांच्या पुष्टीसाठी इतिहासाचा वापर करायला सुरुवात केली तर, विघातक भविष्यकाळच आपल्या हातात असेल. प्रत्येक राज्य आणि त्यामध्ये असणारी ऐतिहासिक परंपरा यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. सोयीच्या आणि द्वेषाच्या, तसेच विघटनाच्या दृष्टिकोनातून इतिहासाची मांडणी करणे सुरू केले तर विविधतेत एकता या ओळीचा अर्थ आम्ही समजावून घेऊ शकलो नाही, असे म्हणावे लागेल. राम, कृष्ण, सोमनाथ आणि या देवदेवतांशी संबंधित पौराणिक इतिहास नीट वाचता येण्याएवढी साक्षरता आणि समतोल विचारधारा निर्माण करण्याचे मोठे आव्हान खरेतर आपल्या शिक्षणपद्धतीसमोर आहे. अर्थात, या शिक्षणपद्धतीवरही भगवा, हिरवा असे रंग दिले जात असल्याने ते न देण्याची सुबुद्धी राम-कृष्णच अशा मंडळींना देवो.

Nilam: