‘राजकीय फायद्यासाठी दंगलीचं राजकारण केलं…’; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये नुकत्याच घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर देशातलं वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. यासंदर्भात आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपावर निशाणा साधला आहे. या सगळ्याला भाजपाच जबाबदार असून या दंगली भाजपानेच प्रायोजित केल्या असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपानं यासाठीच दिल्लीतील स्थानिक निवडणुका पुढे ढकलल्याचा देखील दावा केला आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “देशाच्या दोन प्रमुख शहरांमध्ये ज्या प्रकारे दंग्यांचं वातावरण तयार केलं आहे, विशेषत: सत्ताधारी भाजपाकडून, हे फार दुर्दैवी आहे. देशाच्या राजधानीत दंगली होत आहेत. हे पहिल्यांदा होत नाहीये. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे. तिथे स्थानिक निवडणुका होणार आहेत. त्या आधी तुम्ही पुढे ढकलल्या आणि आता दंगली केल्या आहेत. हे सगळं त्या निवडणुका जिंकण्यासाठी कोणता मुद्दा नाही म्हणून सुरू आहे”.

“मुंबईतही तुम्ही हाच तणाव निर्माण केला आहे. मुंबईत तुमची ताकद नाही. त्यामुळे तुम्ही कुणालातरी पकडून हे काम दिलं आहे. आणि तुम्ही भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. देशाची अर्थव्यवस्था आत्ता कुठे मूळ पदावर येत आहे. पण पुन्हा एकदा राजकीय फायद्यासाठी दंगलींचं राजकारण केलं, तर देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षाही खाली जाईल, संपून जाईल. देशातले दंगे सत्ताधारी पक्षानं प्रायोजित केले आहेत”, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे राऊत म्हणाले, “आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिथे शक्य आहे तिथे एकत्र लढू. हा यशस्वी फॉर्म्युला महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. त्याच फॉर्म्युल्याची भिती ज्यांना वाटतेय, त्यांनी फोडा आणि झोडा असं ब्रिटिशनीतीचं राजकारण सुरू केलं आहे. पण महाराष्ट्राची जनता त्याला भीक घालणार नाही”.

Sumitra nalawade: