दुर्लक्ष : तरवडेवस्तीतील कृष्णानगर येथील प्रकार
राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
पुणे: जलवाहिनी ड्रेनेज चेंबरलगत येणार नाही, याची काळजी खरेतर पालिकेने घेणे आवश्यक आहे. भविष्यात चेंबर भरला आणि जलवाहिनीस गळती लागली तर अनेक घरांत गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे. हाच प्रकार तरवडेवस्ती-वानवडी रस्त्यावर कृष्णानगर लष्कर येथे घडला आहे.
पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीची दुरुस्ती केल्यानंतर चेंबर बांधले. मात्र, त्याला झाकण नसून, आऊटलेट नसल्याने त्यामध्ये दूषित पाणी साचले आहे. दुर्गंधीयुक्त पाणी झिरपून जलवाहिनी फुटली असेल, त्या ठिकाणी मिसळत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावे लागत असल्याची तक्रार येथील सुवर्णा शिवरकर, स्मिता भुजबळ, नलिनी जाधव, सुनंदा वाडकर, सौदामिनी घुले, अस्मिता तरवडे या महिलांनी नागरिकांच्या वतीने केली.
महापालिकेने उपनगरालगतची गावे समाविष्ट करून घेतल्यानंतर करवसुली सुरू केली आहे. मात्र, त्या बदल्यात किमान नागरी सुविधासुद्धा मिळत नाहीत. कचरा उचलला जात नाही, पिण्याचे पाणी मिळत नाही.
– शीतल जाधव, तरवडेवस्ती
पालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गेल्या तीन महिन्यांपासून कृष्णानगर येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाही. उपनगर आणि लगतच्या गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी वारंवार फुटणे आणि व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे.
लष्कर पाणीपुरवठा केंद्राकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. या कामाची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. पालिका प्रशासनाने जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलाव्यात आणि व्हॉल्व्ह, तसेच सार्वजनिक ठिकाणच्या नळाला चाव्या बसवून पाणी गळती थांबवावी, अशी मागणी सचिन आंबेकर, निखिल तरवडे, सुभाष जरांडे, मयूर डांगमाळी, गुलाब वाडकर, खंडेराव जगताप, सचिन सातव, संजय भुजबळ, संतोष जाधव यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
उपनगर आणि लगतच्या गावातील पाझर तलाव परतीच्या पावसाने तुडुंब भरले आहेत. धरणामध्ये मुबलक पाणीसाठा आहे, तरीसुद्धा आम्हाला पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. समाविष्ट गावातील नागरिक कर भरतात, त्याबदल्यात किमान पिण्याचे पाणी तरी द्या, अशी मागणी कृष्णानगर येथील रहिवाशी रेश्मा भुजबळ यांनी केली आहे. खराब पाणी येऊ लागल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी वारंवार केली जात आहे.