कोल्हापूर : राजू शेट्टींना खासदार करणार्या शेतकर्यांनी पै पै गोळा करून नवीकोरी आलिशान फॉर्च्युनर कार भेट दिली आहे. त्यामुळे राजू शेट्टी चांगलेच भारावून गेले आहेत. रविकांत तुपकर यांनाही कार भेट देण्यात आली आहे.
शेतकर्यांच्या हितासाठी संघर्षासाठी अनेकवेळा रक्त सांडलेल्या माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींवरील शेतकर्यांचे प्रेम काही नवीन नाही. लोकवर्गणी काढून राजू शेट्टींना खासदार करणार्या शेतकर्यांनी पै पै गोळा करून नवी कोरी आलिशान फॉर्च्युनर कार भेट दिली आहे.
त्यामुळे राजू शेट्टी चांगलेच भारावून गेले आहेत. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविकांत तुपकर यांनाही लोकवर्गणीतून कार भेट दिली आहे. दोघांनाही कार लोकवर्गणीतून देत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांवरील प्रेम अधोरेखित केलं आहे. राजकीय नेत्यांचा राजेशाही थाट आणि त्यांचा आलिशान गाड्यांचा थाट सर्वसामान्यांचे डोळे चांगलेच विस्फारून जातात.
मात्र, शेतकर्यांसाठी संघर्ष करीत असलेल्या राजू शेट्टी यांचा प्रवास याला नक्कीच अपवाद राहिला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील मातबरांविरोधात लढण्यासाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील शेतकर्यांनी त्यांना नेहमीच शंभर हत्तींचे बळ दिले आहे. त्यामुळेच राजू शेट्टींचा प्रवास खासदारकीपर्यंत पोहोचला. राजू शेट्टी यांनी २००९ मध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शड्डू ठोकल्यानंतर शेतकर्यांनीच लोकवर्गणी काढून त्यांना आर्थिक पाठबळ दिले होते.