औरंगाबाद : (Pradeep Jaiswal On Ambadas Danve) एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने शिवसेना खिळखिळी झाल्याचे पहायला मिळत आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे रोज सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजून ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. हाच फाॅर्मुला औरंगाबादच्या राजकारणात रंगताना दिसत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिंदे गट यांच्यामध्ये एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्याची चुरस पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आज मनसेच्या विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल खडसे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंचे खंदे समर्थक विश्वनाथ राजपूत माजी नगरसेविका प्राजक्ता राजपूत यांचे पती आणि ठाकरे गटातील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे शिंदे गटातील आमदार प्रदीप जैस्वाल यांनी गळाला लावलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
यामुळे आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला स्थानिक पातळीवर सुरुवात झाल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. जैस्वाल यांनी सुरु केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला आता अंबादास दानवे कसे उत्तर देणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.