प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीवर नेहमीच भाजपची बी टीम असल्याचा आरोप केल्या जातो. विधानसभेच्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार देऊनही आंबेडकर यांना अपेक्षित असं यश मिळू शकलं नाही. त्यामुळे वंचितची यापुढील राजकीय कारकीर्द नक्की कशी असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.
आगामी काळात महाविकास आघाडी सरकारसोबत जाण्याचे संकेत आज अकोल्यात पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी दिले आहेत. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, आमचा शिवसेनेसोबत युती करण्याचा मानस होता त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी फोनवर संभाषणही झालं होतं. आपण शिवसेनेबाबत युती करण्यासाठी सकारात्मक आहोत. मात्र, आपल्यासोबत कुणीच लग्न करायला तयार नाही, फक्त फिरवायला तयार असल्याची खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली.
आंबेडकरांनी युतीचे संकेत खरंच दिले की नेहमी प्रमाणे त्यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली हे मात्र अजून सांगता येणार नाही. विशेष म्हणजे प्रखर हिंदुत्वाचा विरोध करत तळागाळातील वंचित आणि बहुजन समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. त्यामुळं सध्याच्या परिस्थितीत अन भविष्यातही आंबेडकर महाविकास आघाडीच्या दावणीला लागतील याची शक्यता धूसरच आहे.
दरम्यान वंचितचे युवा नेतृत्व सुजाता आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्या शिवाजीज पार्कवरील भाषणातील का संबंधीच्या वक्तव्याचा चांगलाच खरपूस शब्दात समाचार घेतला होता. राज ठाकरे यांच्या मुलाने हनुमान चालीसा म्हणून दाखवावी; मग आमचाही ठाकरे यांच्या वक्तव्याला विरोध करण्याचा प्रश्नच राहत नाही. असं म्हणत त्यांनी ठाकरेंची कानउघडणी केली होती. अर्थात हिंदुत्वाचं वंचितला नेहिमीच वावगं असल्याचं आपण पाहत आलो आहोत. त्यामुळं शिवसेनेचा भगवा महाविकास आघाडी सोबत गेल्यानं मावळलं असलं तरी त्याचा पाय हिंदुत्वावरच आधारित आहे. हे वंचित चांगलंच जाणून आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आजच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्य हे गांभीर्यान केलं होत की शिवसेनेची खिल्ली उडवली होती याचा अन्वयार्थ लावणं सहज सोप्प आहे.