मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई | Prakash Ambedkar – राज्यात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. असं असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी आज (16 नोव्हेंबर) डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानाला भेट दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

प्रकाश आंबेडकर यांना भाजपशी युती करण्यासंदर्भात विचारण्यात आलं असता, आम्ही भाजपबरोबर जाऊ शकत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच जे कोणी भाजपसोबत जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे असं सांगत शिंदे गटाशी युती करण्याचा दावाही प्रकाश आंबेडकरांनी फेटाळून लावला.

“आम्ही भाजपबरोबर जाऊ शकत नाही. आम्ही त्यांच्यासमोर काही मुद्दे उपस्थित केले आहेत. समाजरचनेसंबंधी आमचं भांडण आहे. जोपर्यंत त्यासंबंधी विचार केला जात नाही तोपर्यंत भाजपसोबत जाण्याचा संबंध नाही. जे कोणी भाजपसोबत जातील त्यांच्यासोबत न जाण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीनं काही प्रतिसाद दिला नाही तर फक्त स्वबळावर लढण्याचा पर्याय आमच्याकडे आहे”, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Sumitra nalawade: