मुंबई : (Prakash Ambedkar On Narendra Modi) २०२४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्यावर शाब्दिक हल्ला केला. देश परत एकदा फाळणीच्या दिशेने जात आहे, असं ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, मला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते, कारण भारतीय जनता पक्ष १९५० मध्ये नव्हता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२२-२३ मध्ये झालीये. अमित शाहांनी मला सांगावं की ते अर्धी चड्डी घालून आरएसएसच्या शाखेत गेलेत का? आरएसएसचा स्वातंत्र्याचा इतिहास नाही. ते ब्रिटिशांचे हस्तक म्हणून राहिले, असं आंबेडकर म्हणाले.
पाकिस्तानचा १४ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आहे. मी हा इतिहास सांगतोय कारण, फाळणीची जखम भरुन निघालेली आहे. पण, आता खपल्या काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. १५ ऑगस्ट निमित्ताने प्रत्येक गावामध्ये एक दगड लावण्याचं काम सुरु झालं आहे. हे पंतप्रधान मोदींचेच काम आहे. भाजप आणि नरेंद्र मोदी यांना देशाची पुन्हा फाळणी करायची आहे का? भाजप, आरएसएस आणि मोदी यांचे राजकारण आता देशाच्या फायद्याचे नाही, असं मत त्यांनी व्यक्त केले.